फ्लेक्सबाजी करताय तर व्हा सावधान : सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स लावणाऱ्यांवर पोलीसांनी केला गुन्हा दाखल

आंबेगाव : स्वतःचे किंवा आपल्या नातेवाईक, मित्र आणि नेत्यांचे फ्लेक्स गावभर लावून जी टिमकी मिरवली जाते त्यावर आता पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अशीच एक कारवाई आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली असून यामुळे फ्लेक्सबाजांमध्ये खळबळ माजली आहे.
आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे सार्वजनिक ठिकाणी विना परवाना फ्लेक्स लावल्याबद्दल पोलीसांनी स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल केला आहे.
कुंदन अजित काळे (परांडा घोडेगाव, ता.आंबेगाव जि.पुणे) याच्यावर घोडेगाव पोलीसांनी सार्वजनिक ठिकाणी विना परवाना फ्लेक्स लावणे आणि विरुपन करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नामदेव नावजी ढेंगळे (पो.कॉ.घोडेगाव पोलीस स्टेशन) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नामदेव ढेंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी कुंदन काळे याने दि.18 ऑक्टोबर रोजी घोडेगाव येथील जनता विद्यालय, चिंचोली कोकण्याची येथील चौकात, गिरवली बसस्टॉप, पिंपळगाव घोडे चौक, शिनोली बसस्टॉप आणि डिंभा येथील चौकात विना परवाना फ्लेक्स लावून विरुपन केले आहे. त्यामुळे आरोपीवर भादवी कलम 188, महाराष्ट्र मालमत्तेचे विरुपनास प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पो.ना सुरकुले हे करीत आहेत.