पुणे : अनेकवेळा आवाहन करूनही बिनधास्तपणे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना आता पीएमआरडीए (PMRDA) ने दणका देण्यास सुरुवात केली आहे. मारुंजी परिसरात अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या 6 मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम अखेर जमीनदोस्त करण्यात आले आहे.
PMRDA च्या या कारवाईने आता मात्र अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अशीच काही कामे दिघीमध्ये रस्त्याच्या कडेला सुद्धा झाल्याचे समजत असून या कामांची परवानगी घेताना यामध्ये अनेक घोटाळे करण्यात आल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आता या बांधकामांची सुद्धा चौकशी होणार का याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
आज पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ने मारुंजी येथील सर्वे नं. 45/1/2 मधील विनापरवाना असलेल्या सहा मजली इमारतीवर निष्कासणाची मोठी कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पीएमआरडीए ची अनधिकृत बांधकामे, प्लॉटिंग, होर्डिंग आणि अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई सुरू आहे.
PMRDA कडून नागरिकांना आवाहन – PMRDA ने नागरिकांना आवाहन करताना, परवानगीविना कोणतेही बांधकाम करू नका आणि प्रशासनास सहकार्य करा. अनधिकृत बांधकामांमुळे नियोजनबद्ध विकासास अडथळा निर्माण होतो आणि पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो असे आवाहन करतानाच, कोणत्याही अनधिकृत कामावर कधीही कारवाई होऊ शकते असा इशाराही PMRDA ने दिला आहे.