दौंड तालुक्यातील विविध समस्यांबाबत आमदार राहुल कुल यांनी घेतली जिल्हाधिकारी, PMRDA आयुक्तांची भेट



पुणे : सहकारनामा ऑनलाइन

दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आज  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व विविध शासकीय अधिकाऱ्यांची आज भेट घेत अतिवृष्टीमुळे दौंड तालुक्यात झालेल्या नुकसानीसंदर्भात तसेच विविध विषयांवर चर्चा केली.

अधिकाऱ्यांशी झालेल्या या चर्चेमध्ये प्रामुख्याने दौंड तालुक्यात दि. १४ ते १७ ऑक्टोबर २०२० च्या दरम्यान सुमारे १८५ मिमी पाऊस होऊन मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती त्यावेळी ओढ्याचे तसेच पुराचे पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे ऊसाच्या पिकाचे, भुसार पिकांचे व फळ बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले,  अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या गाई, म्हशी, बैल आदी वाहून जाऊन पशुधनाची देखील मोठी हानी झाली होती. 

अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचे पाणी घरांमध्ये शिरून घरातील जीवनावश्यक वस्तुंचे, घर व वखारी मधील साठवलेले धान्याचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याचे तातडीने पंचनामे करून नागरिक व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अतिवृष्टीमुळे दौंड तालुक्यातील अनेक मोठे व छोटे रस्ते, छोटे पूल, बंधारे वाहून गेले त्याची दुरुस्ती तातडीने करण्यासाठी निधी मिळावा अशी मागणी आ.कुल यांनी केली.

महसूल कर्मचारी व कोतवाल संघटना यांचे निवेदन मागील आठवड्यात त्यांना प्राप्त झाले होते. त्यानुसार पुणे जिल्ह्यात कोतवाल पदोन्नोती बाबत महाराष्ट्र शासन निर्णय क्र. बैठक २०१६/प्र. क्र. ५८१/ई/१० दि. ०६/०२/२०१९ मधील निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी होण्याबाबत त्यांनी जोर दिला.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे (IAS) यांची भेट घेऊन PMRDA अंतर्गत दौंड तालुक्यातील समाविष्ट गावांतील विविध विकास कामांबाबतही चर्चा केली.