प्रधानमंत्री आवास योजना : लाभार्थ्यांच्या खात्यावर त्वरित पैसे जमा करावेत – आमदार राहुल कुल

पुणे : प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून दौंड तालुक्यामध्ये अनेक घरकुले मंजूर झाल्यानंतर यातील लाभार्थ्यांचे जिओ टॅग झाले होते व त्यांनी प्लिंथ लेवल पर्यंत काम करावे त्यानंतर त्यांना पहिला मिळेल असे सांगण्यात आले होते. आपले हक्काचे घर आपल्याला बांधता येणार या आशेने पात्र लाभार्थ्यांनी इकडून-तिकडून उसने पैसे घेऊन प्लिंथ लेवल पर्यंत आरसीसी काम केले आहे. मात्र अजूनही या लाभार्थ्यांना कोणतेच पैसे अजून मिळाले नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे. लोकांची नेमकी अडचण समजून घेऊन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी यावर आता आवाज उठवला आहे.

पुणे महानगर विकास प्राधिकरण अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील दौंड तालुक्यातील लाभार्थ्यांना वर्क ऑर्डर मिळाल्या असून अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामे सुरू झालेली आहेत.

अनेक घरकुलांचे प्लिंथ लेव्हल पर्यंतचे काम पूर्ण झाले असुन संबंधित यंत्रणेमार्फत स्थळ पाहणी, जिओ टॅगिंग आदी प्रक्रिया पूर्ण होऊन २-३ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु अद्यापही त्यांच्या खात्यावर एकूण २.५ लक्ष अनुदानापैकी १ लक्ष रुपये अनुदानाचा पहिला हफ़्ता जमा झालेला नाही त्यामुळे पुढील कामे प्रलंबित राहिलेली आहेत.

दौंडचे आमदार राहुल कुल यांनी लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हफ़्ता तातडीने वर्ग करण्यात यावा यासाठी आज PMRDA चे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांची भेट घेत लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये तातडीने वर्ग करणे बाबत संबंधिताना आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे. आमदार राहुल कुल यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे घरकुल योजनेतील लाभार्त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून लवकरच त्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होईल अशी चर्चा लाभार्थ्यांमध्ये सुरू झाली आहे.