शिक्षकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले

वाशिम : वाशिम येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका शिक्षकाला पट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आल्याची ही घटना असून यामुळे परिसरामध्ये खळबळ माजली आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार दिलीप सोनवणे असे या शिक्षकाचे नाव असून मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथे जिल्हापरिषद शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. दिलीप सोनवणे यांना मालेगाव-आमखेड रस्त्यावर दोन दुचाकिंवर आलेल्या अज्ञात इसमांनी लोखंडी रॉड ने अगोदर मारहाण केली आणि नंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्यात आले. या शिक्षकाला अगोदर मालेगाव येथील शासकीय आणि नंतर वाशीम येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला असल्याचे घोषित करण्यात आले.

घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून घटनेची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. वयक्तिक वादातून या शिक्षकाला इतक्या क्रूर पद्धतीने मारण्यात आल्याची माहिती मिळत असून पोलिसांनी आता आरोपिंचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.