संपूर्ण राज्यात जनतेचे हाल सुरु आहेत, गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे आणि सरकार दडपशाहीचे राजकारण करत आहे – खासदार सुप्रिया सुळे

अख्तर काझी

दौंड : महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे हाल चालू आहेत, येथील शेतकरी अडचणीत आहे याचे भान सरकारला नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होळी खेळण्यांमध्ये मग्न आहे हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. संपूर्ण राज्यात गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे आणि सरकार दडपशाहीचे राजकारण करीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार म्हणजे ED सरकार आहे अशी घनाघाती टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

दौंड मध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने सुळे येथे आल्या होत्या. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. यावेळी मा.आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे, आप्पासाहेब पवार, वीरधवल जगदाळे, गुरुमुख नारंग, सोहेल खान आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, सर्वसामान्य जनतेची मंजूर झालेली कामे अडविण्याचे काम सरकारकडून होत आहे. त्यासाठी आम्ही न्यायालयात लढा देत आहोत. फक्त दौंड मध्येच नाहीतर संपूर्ण राज्यामध्ये दबावाचे आणि अडवणुकीचे राजकारण सुरू आहे. रेल्वे प्रशासनाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, रेल्वे मंत्रालय दौंड च्या बाबतीत का अन्याय करत आहे हे कळत नाही. वंदे भारत एक्सप्रेस दौंडला पहिल्या दिवशी थांबू शकते तर रोज का नाही थांबू शकत. वंदे भारतच काय सर्वच गाड्या दौंडला थांबल्याच पाहिजेत. सर्वसामान्य जनतेसाठी जर रेल्वे असेल आणि ती जर महत्त्वाच्या ठिकाणी थांबणार नसेल तर उपयोग काय अशा ट्रेनचा. रेल्वे गाड्यांची थांबे रद्द करून रेल्वे प्रशासनाला फायदा काय? मग कोणासाठी ट्रेन चालवली जात आहे असा प्रश्नही सुळे यांनी उपस्थित केला. रेल्वे नक्की कोणासाठी चालली आहे याचे आत्मचिंतन रेल्वे प्रशासनाने करण्याची गरज आहे, आणि या सर्व गोष्टीला रेल्वे मंत्रालय जबाबदार आहे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुण्यातील कसबा पेठ मतदार संघातील महाविकास आघाडीच्या विजयाबाबत प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या की, मराठी माणूस स्वाभिमानी आहे, राज्यातील मतदार विकाऊ नाही हे कसबा पेठ मतदार संघातील मतदारांनी सर्वांना दाखवून दिले आहे.
दौंड येथे नव्याने झालेल्या कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशन परिसरात गुन्हेगारी वाढतच चालली आहे, या ठिकाणी रेल्वे प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मारहाण करून लुटले जात आहे. आणि रेल्वे प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. या स्टेशनवर थांबणाऱ्या गाड्यांना फक्त दोन मिनिटांचा थांबा देण्यात आलेला आहे त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे या बाबी पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि यावर काहीतरी उपाययोजना करण्याची मागणी केली.