दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामध्ये असणाऱ्या धुमळीचा मळा येथे दोन दिवसांपूर्वी झाडावर बसलेले तीन मोर (Peacock) जमिनीवर कोसळून जायबंदी झाल्याचे आढळले होते. आज दि.2 फेब्रुवारी रोजी पुन्हा त्याच पद्धतीने अजून एक मोर जायबंदी अवस्थेत आढळल्याने मोरांसोबत होणाऱ्या या घटनांचे गूढ वाढत चालले आहे.
दोन दिवसांपूर्वी तीन मोर या परिसरात अचानक जमिनीवर कोसळून ते मरणासन्न अवस्थेत पोहोचले होते. त्यांना उडताही येत नव्हते की फिरताही येत नव्हते हि बाब येथील शेतकरी वैजनाथ गायकवाड यांनी वन कर्मचाऱ्यांना सांगितल्यानंतर वन मंडलाधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनखाली वन कर्मचारी शितोळे व अन्य वन कर्मचारी या मोरांना उपचारासाठी पुण्याला घेऊन गेले होते.
अजून या तीन मोरांचा अहवाल येणे बाकी
असतानाच आज पुन्हा एक मोर (Peacock) झाडावरून कोसळून बेशुद्धावस्थेत आढळल्याने या मोरांबाबत गूढ वाढले आहे. हे मोर नेमके कोणत्या कारणामुळे जायबंदी होत आहेत हे अजून समजू शकले नसले तरी लवकरच त्यांचा अहवाल येईल आणि याचा उलगडा होईल अशी माहिती वन परिमंडल अधिकारी चैतन्य कांबळे यांनी सहकारनामा शी बोलताना दिली आहे.