मुंबई : राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी काल अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन विविध नियुक्त्या आणि सध्याच्या घडामोडीवर भाष्य केले आहे. याबाबत राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार विधिमंडळाचे नेते तर प्रदेश अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली आहे. आणि शरद पवारांचा आम्हाला बडतर्फ करण्यात आल्याचा आदेश आम्हाला लागू होत नाही असेही त्यांनी जाहीर केले आहे.
अजित पवारांची प्रेस कॉन्फरन्स सुरू व्हायच्या अगोदर शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली असल्याचे आणि त्या नऊ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात मागणी केली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रदेश अध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली असून जयंत पाटील यांची प्रदेश अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.
यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महिला प्रदेश अध्यक्षपदी रुपाली चाकणकर, प्रदेश प्रवक्तेपदी अमोल मिटकरी, प्रतोदपदी अनिल पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुरज चव्हाण यांची निवड करण्यात आल्याची माहिती सुनील तटकरे तसेच अजित पवारांनी दिली. तर अजित पवार यांना विधिमंडळाचे नेते म्हणून नियुक्त करण्यात आल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.