पाटस ‘टोल प्लाझावर’ 20,21 ऑक्टोबरला मराठा मोर्चेकऱ्यांच्या वाहनांना मोफत सोडणार, जरांगे यांच्या सभेला जाणाऱ्या वाहनांचा टोल न घेण्याची ‘शिवसंग्राम’ पक्षाची मागणी मान्य

दौंड : पुणे सोलापूर एक्सप्रेस वे. प्रायव्हेट लि. पाटस टोल प्लाझा चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिवसंग्राम पक्षाच्या वतीने पुणे जिल्हाध्यक्ष वसंत साळुंखे यांनी दि.२० व दि.२१/१०/२०२३ रोजी बारामती व इंदापुर येथे मराठा आरक्षणा संदर्भात होणाऱ्या जाहीर सभेसाठी टोल प्लाझा वरुन जाणाऱ्या वाहनांना या दिवशी टोल न आकारता मोफत सोडण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली होती. ती मागणी पाटस टोल प्लाझाने मान्य केल्याची माहिती शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत साळुंखे यांनी दिली आहे.

दि.२०/१०/२०२३ व दि.२१/१०/२०२३ रोजी बारामती व इंदापुर येथे मराठा आरक्षणाबाबत मराठा योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेस पाटस टोल प्लाझावरून या दोन्ही दिवस सकल मराठा समाज बांधवांची वाहने या टोल प्लाझावरुन जाहीर सभेस जाणार आहेत. त्यामुळे सकल मराठा समाज बांधवांच्या वाहनांकडुन टोल न घेता ही सर्व वाहने मोफत सोडण्यात यावीत अशी विनंती शिवसंग्राम पक्षाच्या वतीने करण्यात आली होती.

बारामती आणि इंदापूर येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला राज्यातून लाखो मराठा समाज बांधव येणार असल्याची माहिती आयोजकांकडून मिळत आहे. त्यामुळे टोल प्लाझावर गर्दी होऊन कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी अगोदरच सर्वांना शिस्तपालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यातच आता शिवसंग्राम पक्षाने पाटस टोल प्लाझावर वाहनांना टोल न घेण्याची मागणी करत त्याला टोल प्रशासनाने संमती दिल्याने येथे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.