Patas Toll Plaza : 1 किमी साठी 150 रुपये टोल! पाटस टोलनाक्यावर स्थानिकांची लूट. रयत क्रांतीकडून आंदोलनाचा इशारा



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील पाटस येथे पुणे सोलापूर हायवेवर असलेल्या पाटस टोल प्लाझा Patas Toll Plaza या टोल नाक्यावर स्थानिक प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात असल्याचा आरोप रयत क्रांती संघटनेचे नेते आणि प्रदेश प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी केला आहे. हि लूट त्वरित न थांबल्यास या टोलनाक्यावर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

रयत क्रांती संघटनेचे प्रदेश प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी माहिती देताना दौंड तालुक्यातील पाटस, गार, गिरीम, कानगाव येथील नागरिकांना कोर्ट, आरटीओ तसेच इतर शासकीय आणि विविध कामांसाठी बारामतीला जावे लागते. 

या 3-4 गावांतील नागरिकांना बारामतीला जाताना मध्ये पाटस टोल नाका Patas Toll Plaza लागतो. या टोलनाक्यावरून बारामती फाटा अवघा अर्धा किलोमीटर आहे तर जाऊन-येऊन हे अंतर 1 किमी भरते. जाऊन येऊन 1 किमी भरत असलेल्या अंतरासाठी या टोल प्लाझावर सुमारे 150 रूपये टोल वाहन चालकांना भरावा लागतो. कारण बारामतीला जाणारी साईड लेन येथे बंद करण्यात आली असून तुम्हाला बारामतीला जरी जायचे असेल तरी याच टोलवर येऊन टोल भरल्याशिवाय तुम्हाला जात येत नाही असा नियमच येथे अधोरेखित करण्यात आलेला आहे.

50-60 किमीसाठी आकारला जाणारा टोल हा 1 किमीसाठी सुद्धा तितकाच आकारला जातो त्यामुळे ही सर्वसामान्य, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांची लूट आहे आणि ही लूट आम्ही होऊ देणार नाही, वेळ प्रसंगी येथे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रदेश प्रवक्ता भानुदास शिंदे यांनी दिला आहे.

याबाबत पाटस टोल प्लाझाचे मुख्य अधिकारी सिंग यांना संपर्क केला असता त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.