अब्बास शेख
दौंड : बारामती लोकसभा मतदार संघातील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार महेश भागवत यांच्या प्रचारार्थ उद्या दौंड तालुक्यातील चौफुला येथील श्री कृष्ण मंगल कार्यालय येथे सायंकाळी 4:00 वाजता कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे तसेच याच पार्टीचे उपाध्यक्ष टी.पी मुंडे, ओबीसी कुणबी सेनेचे बावकर आणि बहुजन आगरी समाजाचे नेते जे डी तांडेल हे उपस्थित राहणार आहेत.
सध्या संपूर्ण देशाचे लक्ष बारामती लोकसभा मतदार संघाकडे लागले आहे. येथील प्रत्येक घडामोड ही बातमी बनत आली आहे. इतक्या महत्वाच्या लोकसभा मतदार संघात ओबीसी बहुजन चेहरा म्हणून महेश भागवत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महेश भागवत हे एक उच्चशिक्षित, अभ्यासू व्यक्तिमत्व असून त्यांनी या अगोदर पाणी प्रश्न आणि भौगोलिक परिस्थितीवर अभ्यासू वृत्तीने आपली मते मांडली आहेत. भागवत यांचे वडील सिताराम भागवत हे पुणे जिल्ह्यातील राजकिय वलयातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व होते मात्र त्यांच्यानंतर त्यांच्या परिवाराला कायम राजकीय पदे आणि मुख्य प्रवाहातून बाजूला ठेवले गेले असा आरोप त्यांचे निकटवर्तीय आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
ओबीसी बहुजन पार्टीने त्यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढल्याचे दिसत आहे. उद्या जास्तीत जास्त कार्यकर्ते उपस्थित राहून तळागाळातील लोकांपर्यंत आपले विचार पोहचवतील असा विश्वास आयोजक व्यक्त करत आहेत.