मुंबई : ड्रग्ज पार्टीवरील कारवाई नंतर त्यांच्या कारवाईला संशयास्पदरित्या पाहिले जाऊन उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना आता नवनवीन खुलाश्यांनी बळकटी येत असल्याने समीर वानखेडे यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे.
समीर वानखेडे यांनी कोऱ्या कागदांवर आमच्या सह्या घेतल्या होत्या असा आरोप या आर्यनच्या ड्रग्ज पार्टीतील प्रथम पंच प्रभाकर साईलने केल्यानंतर आता दुसऱ्या एका नायजेरियन नागरिकाच्या केसमध्ये एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावतीने आपल्याला फोनकरून बोलावून घेत आपल्या 10 कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या असा गौप्यस्फोट शेखर कांबळे या पंचाने वृत्तवाहिनींना दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. आधीच आरोप होत असताना पुन्हा या नवीन प्रकरणामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.
राज्यसरकार मधील मंत्री नवाब मलिक यांनी या अगोदर आपल्या आरोपांमध्ये समीर वानखेडे यांनी बनावट केसेस करून लोकांना खोट्या केसेसमध्ये गुंतविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला होता. यात नवनवीन माहिती आणि कागदपत्रे त्यांनी समोर आणून वानखेडे यांनी जातीचे दाखलेही बनावट वापरून नोकरी मिळविल्याचा आरोप केला होता. हे सर्व होत असतानाच आता समीर वानखेडे यांनी एका नायजेरियन नागरिकावर ड्रग्ज ची कारवाई करताना कोऱ्या कागदावर आपल्या सह्या घेतल्याचा दावा शेखर कांबळे या पंचाने केला आहे त्यामुळे आता समीर वानखेडे यावर काय उत्तर देतात आणि एनसीबी काय ऍक्शन घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.