यवत : दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन येथे नागरिकांच्या विविध तक्रारिंचे निवारण शनिवार दिनांक 23/9/23 रोजी करण्यात येणार आहे. हा उपक्रम यवत पोलीस स्टेशन येथे तक्रार दिनाचे औचित्य साधून करण्यात येणार आहे.
येत्या 23 तारखेला हा उपक्रम राबविण्यात येणार असून या दिवशी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जास्तीत जास्त अर्जदार व गैरअर्जदार यांनी हजर राहावे असे आवाहन यवतचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.
यवत पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या नागरिकांच्या अनेकवेळा विविध तक्रारी येत असतात. अनेकवेळा या तक्रारी निवारण होण्यात उशीर होतो त्यामुळे तक्रार निवारण दिनाचे औचित्य साधून दोन्हीकडील उभय पक्षांना बोलावून त्यांचे म्हणणे ऐकले जाते आणि यातून वाद न होता काही तोडगा निघतो का, दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये दिलजमाई होते का हे पाहिले जाते. अनेकवेळा दोन्ही पक्षांना आपापली भूमिका मांडता येऊन वर्षानुवर्षे सुरु असलेले वाद या ठिकाणी मिटल्याचे पहायला मिळाले आहे.