यवत (दौंड) : यवत तालुका दौंड येथील हर्षवर्धन लॉन्स येथे स्वर्गीय सुभाष अण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्रावण मासानिमित्त सोमवार दिनांक १९ पासून तालुकास्तरीय भजन स्पर्धा व किर्तनमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली.
या संदर्भात आमदार कुल म्हणाले, १९ ते २४ ऑगस्ट दरम्यान हर्षवर्धन लॉन्स यवत येथे भजनस्पर्धा व किर्तनमाला होत आहेत. भजन स्पर्धेमध्ये एकूण ४ गट करण्यात आले असून प्रत्येक संघाला ११ मिनिटे वेळ देण्यात येणार आहे या वेळेत एक अभंग व एक गवळण सादर करायची आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील किमान एक संघ यामध्ये सहभागी होणार आहे. प्रत्येक दिवसाच्या विजेत्यांची फायनल गुरुवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी होणार आहे तर शुक्रवार २४ ऑगस्ट रोजी तालुक्यातील कीर्तनकार ,गायक, मृदुंग वादक व हार्मोनियम वादक यांचा सत्कार केला जाणार आहे.
कीर्तन मालेनिमित्त सोमवार १९ ऑगस्ट रोजी सुरेश महाराज साठे, मंगळवार २० ऑगस्ट रोजी चैतन्य महाराज निंभोळे, बुधवार २१ ऑगस्ट रोजी महादेव महाराज राऊत, गुरुवार २२ ऑगस्ट रोजी प्रभू महाराज माळी, शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी ज्ञानदेव महाराज नामदास व शनिवार २४ ऑगस्ट रोजी पुंडलिक महाराज देहुकर यांची कीर्तन होणार आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.