दौंड शहर | विरोध करणाऱ्यांनी भान ठेवावे, अन्यथा तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही – मनोज जरांगे पाटील

अख्तर काझी

दौंड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सकल मराठा समाज एकवटला आहे, आमच्या लेकरांच्या भविष्याचा व आयुष्याचा प्रश्न असल्यामुळे सामान्य मराठा समाजाने खूप कष्टाने हा लढा उभा केला आहे, याला विरोध करणाऱ्यांनी थोडे भान ठेवावे की मराठा समाजातील लेकरांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याने त्या मुलांचे तुमच्यामुळे आणि तुम्ही विरोध केल्यामुळे मुडदे पडू नयेत अन्यथा मराठा समाज तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी दिला.

24 डिसेंबरला आरक्षण मिळणारच.. मराठा आरक्षणासाठी लढणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचे दौंड शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. मनोज जरांगे पुढे म्हणाले, सरकारचे आणि आपले ठरले आहे की नोंदीच्या आधारावर अहवाल बनवायचा आणि तो अहवाल स्वीकारून 24 डिसेंबर रोजी कायदा पारित करायचा आणि समस्त मराठा समाजाला आरक्षण द्यायचे. 24 डिसेंबरला मराठ्यांच्या विजयाचा सुवर्ण दिवस उगवणार आहे. सर्वजण जागरूक रहा आणि याचा जर कोणाला पोटसूळ झाला असला तर त्यांनी आरक्षण घेऊ नये परंतु गोरगरीब लेकरांना घेऊ द्यावे आणि त्यांचे कल्याण होऊ द्यावे.

आम्ही क्षत्रिय ही आहोत आणि शेतकरीही, जास्त अडवणूक कराल तर माज मोडू… आम्हाला दोन अंग आहेत, आम्ही क्षत्रिय मराठे आहोत 96 कुळी, दुसरे अंग आहे आम्ही शेतकरी आहोत. आम्ही जमीन कसतो आणि देशाला धान्य पुरवतो म्हणून शेतीला आमचे आजोबा, पणजोबा कुणबीच म्हणायचे. फक्त सुधारित शब्द शेती आला आहे म्हणून आम्ही प्रमाणपत्र घ्यायचे नाही का? त्यामुळे कोणीही गोरगरीब लेकरांच्या ताटात माती कालवायचे काम करू नये. आता सरकार आपल्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करेल त्यांचे कार्यकर्ते आपल्या विरोधात काम करतील. कारण छत्रपती शिवरायांना सुद्धा जास्त करून आपल्याच लोकांकडून त्रास झाला होता. तसेच आपले सुद्धा काही नमुने असू शकतात की ज्यांना लई कंड आहे. त्यांना जरा गप्प बसायला सांगा नाहीतर मराठा त्यांचा कंड जिरवतील असा इशाराही जरांगे यांनी दिला.

षडयंत्र रचून मराठ्यांना आरक्षणापासून दूर ठेवले… 70 वर्षापासून थांबलेला मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे, 70 वर्षापासून मिळत नसलेले पुरावे आता गावागावात, तालुक्यात, जिल्ह्यात मिळू लागले आहेत. सत्तर वर्षापासून ज्यांनी ज्यांनी षडयंत्र केले की, मराठा समाजाची लेकरे मोठी होऊ नयेत, म्हणून ज्यांनी ज्यांनी षडयंत्र रचले त्यांचे षडयंत्र सर्वसामान्य मराठ्यांनी मोडून काढले आहेत. 1967 च्या आधीपासून पासून 2023 पर्यंत जर मराठ्यांचे पुरावे निघाले आहेत तर मग सत्तर वर्षापासून मराठ्यांचे पुरावे नेमके कोणी लपवून ठेवले होते याचे उत्तर आता समाजाला पाहिजे आहे.

..तर मराठा समाज प्रगत असता 70 वर्षांपूर्वी जर मराठ्यांना आरक्षण दिले असते तर आज जगाच्या पाठीवर सर्वात प्रगत म्हणून मराठ्याची जात आणि पोरे राहिली असती आणि त्यांना नेमके हेच होऊ द्यायचे नव्हते म्हणून त्यांनी मराठ्यांचे पुरावे आपल्या बुडाखाली लपवून ठेवले. समाजाचे 70 वर्षापासून झालेले नुकसान व हक्काचे आरक्षण असतानाही आमच्या जागेवर लागलेले सगळे बाहेर काढून त्यांची संपत्ती सुद्धा जप्त करा असे आव्हान त्यांनी केले. सरकार आरक्षण कसे देत नाही ते आपण बघू त्याची काळजी तुम्ही करू नका, आरक्षण मिळाल्याशिवाय तुमचा मुलगा एक इंचही मागे सरकणार नाही असा शब्दही मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.