online fraud – दौंडकर ‛बम्बैया’ च्या बँक खात्यातील लाखो रुपये लंपास, बोगस सह्या करून बँक खाते केले रिकामे



|सहकारनामा|

दौंड : दौंड पोलीस प्रशासन व येथील उपजिल्हा रुग्णालय यांच्या मदतीला नेहमीच धावणारा जीवक शिवाजीराव भोसले उर्फ बम्बैया याच्या बँक खात्यातील 2 लाख 40 हजार रुपयांची रक्कम कोणीतरी अज्ञाताने लंपास केली असल्याची घटना समोर आली आहे. जीवक उर्फ बम्बैया(रा. उपजिल्हा रुग्णालय वसाहत, दौंड) याने याबाबत दौंड पोलिसात तक्रार केली आहे.

जीवक याचे येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत बचत खाते आहे. बँकेचे पुस्तक गहाळ झाल्याने जीवक याने बँकेकडे अर्ज करून नवीन पुस्तक घेतले. बँक पुस्तकामध्ये खात्यावरील व्यवहारांची नोंद करून घेतली असता असे निदर्शनास आले की,दि.8 डिसेंबर 2020 ते 31 मे 2022 या कालावधीत सुमारे 2 लाख 40 हजार रुपये परस्पर काढले गेले असल्याचे दिसून आले. या कालावधीत स्वतः जीवक याने कोणतीही रक्कम काढलेली नाही, सदरच्या खात्यातून पैशाची अफरातफर झाली आहे. खात्यातून गायब झालेल्या पैशाच्या प्रकरणाची असून चौकशी व्हावी व माझ्या खात्यातून गायब झालेली रक्कम पुन्हा मला परत मिळावी अशी मागणी बम्बईयाने दौंड पोलिसांकडे केली आहे. येथील पोलीस प्रशासनाला व उपजिल्हा रुग्णालयाला, बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावणे, अपघात, जळीत, आणि अनर्थ घटनांमधील मृतदेहांच्या शवविच्छेदनासाठी बम्बईयाची मोठी मदत मिळत असते. स्वतःचा जीव धोक्यात घालून मेहनतीने पैसे मिळविणाऱ्या बम्बईयाचे गहाळ झालेले पैसे पोलिसांनी मिळवून द्यावेत अशी मागणी दौंडकर करीत आहेत.