OLX वरून स्कॉर्पिओ गाडी खरेदी करणे पडले महागात, दौंड मधील युवकास अडीच लाखांचा गंडा



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

OLX ॲप वरून स्कॉर्पिओ गाडी खरेदी करणे दौंड मधील युवकास चांगलेच महागात पडले असल्याची घटना समोर आली आहे. दौंड पोलिसांनी याबाबत माहिती दिली असून या माहितीनुसार दौंड येथील युवक राहुल सिद्धार्थ गायकवाड (रा. पुणेकर हॉस्पिटल परिसर, दौंड) याच्या मोबाईल वरील OLX ॲप वर स्कॉर्पिओ गाडी विकण्यासंदर्भात माहिती दिसली. त्यावेळी राहुल याने गाडी विक्रीसाठी दिलेल्या मोबाईलच्या संपर्क क्रमांकावर फोन लावून गाडी बाबत विचारणा केली. त्यावेळेस प्रमोद दामे या इसमाने सदरची स्कॉर्पिओ गाडी आपलीच असल्याचे सांगितले व  मीच OLX वर गाडी संदर्भातील माहिती टाकली असल्याचे सांगत मी इंडियन आर्मी मध्ये नोकरीस आहे मात्र मला पैशाची गरज असल्यामुळे गाडी विकत असल्याचे सांगून राहुल गायकवाड याचा विश्वास संपादन केला.

OLX वरील गाडीचा फोटो पाहून व गाडी मालक इंडियन आर्मीमध्ये नोकरीस आहे यावर विश्वास ठेवून गायकवाड याने गाडी खरेदी करण्याचे ठरविले. गाडी मालक प्रमोद दामे याने राहुल गायकवाड यांना 9126254125@Pay tm या  खात्यावर ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगितले त्यानुसार राहुल याने दि.8/7/2020 ते  9/7/२०२० दरम्यान वेळोवेळी एकूण तब्बल 2 लाख 51 हजार 150 रुपये प्रमोद दामे याने दिलेल्या खात्यावर जमा केले. 

पैसे खात्यावर जमा झाल्या नंतर गाडी मालकाने गायकवाड याला एका डिलिव्हरी बॉयचा नंबर दिला व सांगितले की हा मुलगा गाडी घेऊन तुमच्या घरी येईल. परंतु ठरलेल्या दिवशी  खरेदी केलेली गाडी घरी आली नाही म्हणून गायकवाड यांनी गाडी मालकाशी संपर्क साधला असता त्याचा मोबाईल फोन बंद केलेला आढळला.

म्हणून गायकवाड यांनी डिलिव्हरी बॉयशी संपर्क साधला असता तो म्हणाला की मी गाडी घेऊन येतोच आहे, व त्या नंतर डिलिव्हरी बॉयचाही फोन बंद झाला.

यावरून गायकवाड यांना आपली फसवणूक झाली असल्याचे समजले व त्यांनी दौंड पोलीस गाठून गाडी मालक प्रमोद दामे व डिलिव्हरी बॉय(नाव ,पत्ता उपलब्ध नाही) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली. गायकवाड यांच्या फिर्यादी वरून दौंड पोलिसांनी प्रमोद दामे व अज्ञात मुला विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पो. उप. निरीक्षक प्रकाश खरात करीत आहेत.