आता सांगलीच्या रस्त्यावर धावणार तब्बल 100 ‘शिवाई’ ई-बसेस; खाजगी गाड्यांच्या मनमानीला बसणार चाप

सुधीर गोखले

सांगली : आता महाराष्ट्रातील काही मेट्रो शहरांच्या ‘ई-बसेस’ वाहतुकीच्या यादीमध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश होतोय.. ‘आमची सांगली स्वच्छ सांगली’ यापाठोपाठ आता ‘आमची सांगली..  प्रदूषणमुक्त सांगली’ च्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले जातेय.

राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली विभागामध्ये लवकरच १०० ‘शिवाई’ ई-बसेस दाखल होणार असल्याची माहिती सांगली विभागीय कार्यालयाचे नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली. ई-बसेस च्या परिवहनासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेनेही जय्यत तयारी सुरु केली असताना हि आणखी एक आनंदाची बातमी सांगलीकरांसाठी आहे. सध्या मिरज तालुक्यातील माधवनगर येथे राज्य परिवहन महामंडळाची राखीव दहा एकर जागा आहे तिथे या बसेस ना आवश्यक असणाऱ्या चार्जिंग स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मिरज मध्ये चार्जिंग स्टेशनसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक असणारी निविदा महामंडळाने प्रसिद्ध केली आहे. संबंधित कामं पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील ६ महिन्यांमध्ये सांगलीमधून बाहेरील शहरांसाठी या शिवाई ई बसेस धावतील यात शंका नाही.  सांगली मिरज आणि इस्लामपूर आगारांना या शिवाई ई बसेस चा लाभ होणार आहे. या बसेस चे मार्गही निश्चित झाले आहेत असेही त्यांनी यावेळी नमूद केले.