मुंबई : मी एक गरीब घरातील शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोरगरीब मराठा समाजाची दुःख आणि वेदनेची कल्पना आहे त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय, दिलेला शब्द पाळणं ही माझी कार्यपद्धती आहे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत जमलेल्या मराठा समाजाच्या समोर व्यक्त केले. नुसता देशच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष आपल्या मराठा आंदोलनाकडे लागलं होतं, आपण आपली एकजूट कायम ठेवली म्हणून हे आरक्षण मिळालं असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचे उपोषण मोसंबीचा रस देऊन सोडवले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहीरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर सर्व घटकांच्या हितासाठी घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत देत त्यांच्या कपाळाला गुलाल लावत त्यांचे अभिनंदन केले.