तालुका वार्तापत्र | अब्बास शेख
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा आता संपूर्ण तालुक्यात होऊ लागली आहे. या निवडणूकित गट-तट आणि पक्ष बाजूला पडून नवा ‘बहुजन फॅक्टर’ उदयास आला आहे. दौंड तालुक्यामध्ये या फॅक्टरची मोठी चर्चा सुरु असून यात बहुजन फॅक्टरचा पहिला प्रयोग केडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सफल झाल्याने बहुजन समाजातील ‘ब्रम्हा’, ‘विष्णू’, ‘महेश’ ला मानणाऱ्या दृश्य, अदृश्य नेत्यांमध्ये ‘आनंद’ साजरा केला जात आहे. त्यामुळे यापुढे तालुक्यात राजकीय ‘बादशाहत’ काबीज करण्यासाठी बहुजनांकडे कानाडोळा करणे धोक्याचे ठरणार आहे.
केडगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ‘बहुजन फॅक्टर’ सफल, मात्र तालुक्यात खळबळ केडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत बहुजन एकीचा फॅक्टर सफल झाल्याने गटातटाचे राजकारण बाजूला पडून एक नवा राजकीय अध्याय सुरु झाला आहे. केडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत गट-तट आणि पक्ष संघटना बाजूला ठेवून नविन समिकरणे जुळविण्यात बाळासो कापरे सफल झाले असले तरी त्यांच्यामागे ब्रम्हा, विष्णू, महेश या अदृश्य शक्तीचा आशीर्वाद असल्याची चर्चा रंगत आहे. हा फॅक्टर संपूर्ण तालुक्यात जोर धरू शकतो आणि त्याच्या परिणाम स्वरूप तालुक्यात मोठा बदल घडू घडण्याच्या दृष्टीने टाकण्यात आलेले हे पहिले पाऊल असू शकते असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
बहुजन एकत्रिकरणाला बळकटी देणारा निकाल केडगाव ग्रामपंचायतचा निकाल हा तालुक्यातील बहुजणांची ताकद एकत्र करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऊर्जा देण्याचे काम करणार आहे. निवडणुका जवळ आल्या की ‘तेवढ्यापुरता राजकीय वापर आणि नंतर मात्र अडगळ’ असा अनुभव अनेकजण बोलून दाखवत असतात. ज्यांच्याबद्दल संपूर्ण गावात नाराजी असते, गटाची ताकद क्षीण होते असेच लोक नेत्यांच्या बाजूला बसलेले दिसतात आणि नेतेही त्यांचेच ऐकून निर्णय घेतात कारण ते त्यांचे असतात हा समज किंवा वस्तुस्थिती या तरुणांना आता वेगळा विचार करण्यास भाग पाडू लागली आहे. वेगळेपणाचा अनुभव आलेले बहुजन समाजाचे अनेक धडाडीचे कार्यकर्ते आता अश्या राजकारणाला वैतागले आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकीय समिकरणे बदलण्याचीही शक्यताही वर्तवली जात आहे. गट-तट आणि पक्षांच्या राजकारणाला त्रस्त झालेले लोक आता या बहुजन फॅक्टरकडे वळताना दिसू लागले आहेत. त्यामुळे केडगावसारखा बहुजन फॅक्टर संपूर्ण दौंड तालुक्यात उदयाला आल्यास आश्चर्य वाटायला नको.