केडगाव : दौंड तालुक्यातील बोरीपार्धी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सुनिल नारायण सोडनवर यांच्यावीरुद्ध 17 पैकी 14 ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. त्यामध्ये आज दि.29 मे रोजी सकाळी 11:00 वाजता दौंड तहसीलदार अरुणकुमार शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बोरीपार्धी ग्रामपंचायत मध्ये सरपंच, उपसरपंच आणि इतर सदस्य अश्या 17 जणांची विशेष सभा बोलविण्यात आली होती.
या सभेला 2 सदस्य गैर हजर राहिले तर सरपंचांसहित 15 जणांनी उपस्थिती नोंदवली. या ठिकाणी सरपंचांविरुद्ध घेण्यात आलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने 14 जणांनी आपले मत नोंदवले तर सरपंचांच्या बाजूने 1 असे मत नोंदविण्यात आले. त्यामुळे 14-1 अश्या फरकाने हा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला अशी माहिती दौंड तहसीलदार अरुणकुमार शेलार यांनी ‘सहकारनामा’ ला दिली. विद्यमान सरपंच सुनिल सोडनवर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर आता ते पुढे अपिलात जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पुढील सरपंच कोण..? विद्यमान सरपंचांवर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर आता पुढील सरपंच कोण होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. सरपंच पदासाठी बाळासाहेब दशरथ सोडनवर आणि शेखर सोडनवर यांचे नाव सर्वात जास्त चर्चेत असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. मात्र सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन नविन सरपंच निवडला जाणार की पुन्हा नविन घडामोडी घडून आहे तोच सरपंच राहणार हे येत्या महिन्याभरात समजणार आहे.