महिला व मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणार…… लॉजवर वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई करणार -डीवायएसपी अण्णासाहेब घोलप

दौंड : दौंड शहर व तालुक्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच येथील महिला व मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणार असल्याचे अण्णासाहेब घोलप यांनी स्पष्ट केले. उपविभागीय पोलीस अधिकारी (दौंड ) म्हणून त्यांनी आज पदभार स्वीकारला, पदभार स्वीकारल्यानंतर घोलप यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधत पोलीस प्रशासनाशी संबंधित शहरातील विविध विषयांची त्यांनी माहिती घेतली.

अण्णासाहेब बाळासाहेब घोलप यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पहिल्यांदा ( ऑक्टोबर 2023) सोलापूर ग्रामीण पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारला होता. याआधी पोलीस निरीक्षक व वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी राजगड, सासवड, बारामती, मंचर आदि ठिकाणी आपला कार्यकाळ गाजविला आहे.

शहरातील गुन्हेगारी रोखणे तसेच प्रलंबित गुन्ह्यांचा तपास करण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खास करून लॉजवर वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांवर तर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी संकेत दिले. दौंड येथे पदभार स्वीकारताना सर्वात आधी मी याच व्यवसायाबाबत पोलिसांकडून माहिती घेतली आहे असेही त्यांनी सांगितले.