दौंड : मतदार यादी मधील महिला मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने येथील तुळजाभवानी मंदिर तसेच कटारिया महाविद्यालयामध्ये मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरास महाविद्यालयामधील युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदार नोंदणी केली.
यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अरुण शेलार, नायब तहसीलदार शरद भोंग, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले, कटारिया महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एम. समुद्र, तलाठी एच. टी. फरांदे ,नगरपालिकेचे शाहू पाटील उपस्थित होते. युवा मतदार नोंदणीसाठी शासनाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये शंभर टक्के मतदार नोंदणी होईल यासाठी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन मतदार नोंदणी अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा दौंडचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनाला महाविद्यालयाकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.