‘थोरात गटाला’ शह देण्यासाठी ‘केडगाव’, ‘वाखारी’तील सत्ताधाऱ्यांचे नवनवीन डावपेच

केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहिर झाली आणि शह-काटशह चे डावपेच सुरु झाले. ग्रामपंचायतींमधील विद्यमान सत्ताधारी मंडळींनी पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यासाठी विविध पद्धतीने डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे.

राजकीय डावपेच टाकण्याचा असाच काहीसा प्रकार केडगाव आणि वाखारी ग्रामपंचायतची सत्ता भोगलेल्या राजकीय मंडळींनी सुरु केला आहे. केडगाव, वाखारी या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी थोरात गटाला शह देण्यासाठी थोरात गटातील काही असमाधानी कार्यकर्ते हेरून थेट थोरात गटातच फूट पाडण्याचे काम सुरु केले आहे. यासाठी सत्ताधारी मंडळींनी थोरात गटातील काही कार्यकर्त्यांसोबत दाराआड बैठका घेऊन तुम्ही सुद्धा उभे रहा, आम्ही आतून सहकार्य करू अशी आश्वासने त्यांना देत असल्याचे चर्चेतून पुढे येत आहे.

आपल्यासोबत घ्यायचा नाही, पण त्यांच्यातही राहू द्यायचा नाही अशी सूत्रे सत्ताधारी वापरून थोरात गटाला कश्या पद्धतीने पुन्हा सत्तेपासून दूर ठेवता येईल याचे अडाखे बांधत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या या व्यूह रचनेत काहीजण पुरते अडकून त्यांच्या गळाला लागले असल्याचे ते खाजगीत सांगत आहेत.

आयात उमेदवारांना संधी, तर कट्टर कार्यकर्ते फक्त चटयाच उचलत राहणार… या ठिकाणी ऐनवेळी बाहेरून उमेदवार आयात करण्यात येऊन ‘नाकापेक्षा मोती जड नको’ म्हणून निवडून येण्याची क्षमता असूनही काहींना उमेदवारी नाकारण्यात येत असल्याची मोठी चर्चा सुरु आहे. त्यामुळे निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या कट्टर कार्यकर्त्यांनाही गट आणि पक्षाचा हवाला देऊन यावेळीही त्यांचा पत्ता कट करून चटाया सांभाळण्याचे काम देणार असे एकंदरीत चित्र दिसत आहे. वरिष्ठ नेत्यांना एखादी गोष्ट खटकली तर ते पक्षाचे आदेश झुगारून, पक्ष सोडून अन्य पक्षाचे तिकीट घेतात हा इतिहास आहे. तर कार्यकर्ता कट्टर पणात राहून स्वतःचे राजकीय अस्तित्वच गमावून बसतो हाही इतिहास आहे.