दौंड : युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड शहराध्यक्ष सचिन निळकंठ गायकवाड व साथीदारावर एका महिलेची 18 लाख रु. ची आर्थिक फसवणूक केली असल्याचा गुन्हा दौंड पोलिसात दाखल झाला आहे. या महिन्याभरात राष्ट्रवादीला हा तिसरा झटका बसला आहे. पक्षाच्या एका नगरसेवकावर, महिलेने विनयभंग व खाजगी सावकारीचा गुन्हा दाखल केला, नंतर पक्षाचे नगरपालिकेतील गटनेते बादशहा शेख यांनी पक्षाला सोडचिट्टी दिली तर आता पक्षाच्या युवक अध्यक्षा विरोधात महिलेने आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, कोठे नेऊन ठेवला आहे साहेबांचा पक्ष… अशी म्हणण्याची वेळ पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आली आहे.
आर्थिक फसवणूक झाल्या प्रकरणी वर्षा सुभाष थोरात(रा. समर्थ नगर, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. सचिन निळकंठ गायकवाड व अल्ताफ महम्मद मुलाणी( दोघे रा. दौंड) यांच्या विरोधात दौंड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक केली.
घटनेबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी यांनी बोरीबेल (ता. दौंड) गावच्या हद्दीतील लोणारवाडी येथे पोल्ट्री व्यवसायासाठी चे शेड, घर व मजुरांसाठी खोली, इत्यादीचे बांधकाम करण्यासाठी सचिन गायकवाड व अल्ताफ मुलाणी यांच्याबरोबर करारनामा केला होता. आरोपींनी बांधकाम पूर्ण करण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी बँकेचे धनादेश व रोख स्वरूपात 18 लाख रु. घेतले.दि.1मे 2021 रोजी पर्यंत सदरचे बांधकाम पूर्ण करून देण्याचे ठरले होते. परंतु आरोपींनी पूर्ण पैसे घेऊन सुद्धा दिलेल्या मुदतीत बांधकाम पूर्ण केले नाही व फिर्यादि ची फसवणूक केली. फिर्यादी कडून गायकवाड इंटरप्राईजेस तर्फे सचिन गायकवाड याने 6 लाख रु. तर ए अँड ए इंटरप्राईजेस तर्फे अल्ताफ मुलाणी याने 11 लाख 50 हजार रु. घेतले आहेत तर 50 हजार रुपयांचे बांधकाम साहित्यही आरोपींना दिले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
Home Previos News युवक ‛राष्ट्रवादी’ काँग्रेस शहराध्यक्षावर ‛महिलेची’ आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, दौंड राष्ट्रवादी...