दौंड : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दौंड तालुक्यामध्ये तुतारीने रणशिंग फुकले आहे. याची सुरुवात आज झाली असून महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ नानगाव येथे झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ५ अधिकृत इच्छुक उमेदवारांचे विचार ऐकण्यासाठी रासाईदेवीच्या मंदिरामध्ये मोठ्या संख्येने लोक जमले होते.
महाविकास आघाडीच्या वतीने पारगावपासून पक्षाचा प्रचार दौरा सुरू झाला. आज या दौऱ्यामध्ये नानगाव, पारगाव, एकेरीवाडी, देलवडी, पिंपळगाव, नाथाचीवाडी, लडकतवाडी अशी गावे घेण्यात आली.
या दौऱ्यात आप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, दिग्विजय जेधे, डॅा. वंदना मोहिते, डॅा. भरत खळदकर असे आमदारकीला इच्छुक असणारे पाच उमेदवार सामील झाले होते. या सर्व इच्छुक उमेदवारांनी दौंड तालुक्यातील प्रत्येक गावात एकत्र प्रचार करत आपली भूमिका मांडली. शरदचंद्र पवार साहेब व खा.सुप्रियाताई सुळे यांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून या पाच उमेदवारांनी रणशिंग फुकले आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी तालुक्यातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी उपस्थित वक्त्यांनी सध्याच्या महायुती सरकारवर नाराज असलेली जनता यंदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार निवडूण देईल असा विश्वास व्यक्त केला. या दौऱ्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी या मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.