वैशाली नागवडे यांना ‘भाजप’ कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीचा सर्वच स्तरांतून ‘निषेध’, दौंड तालुक्यात संतापाची लाट


पुणे

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांना झालेल्या मारहाणीचा सर्वच स्तरांतून निषेध केला जात असून वैशाली नागवडे यांना झालेल्या मारहाणीमुळे दौंड तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. वैशाली नागवडे ह्या दौंड तालुक्यातील खामगांव येथील रहिवासी आहेत.

पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे पदाधिकारी बसले असल्याने या ठिकाणी जोरदार राड्याला सुरुवात झाली आणि महागाईच्या मुद्द्यावरुन बालगंधर्व रंगमंदिरातील या कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येऊन ठाकले त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलीस बाहेर घेऊन जात असताना भाजपच्या कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या मारहाणीत वैशाली नागवडे यांच्या डोक्याला व कानाला मार लागला असल्याने त्यांना सध्या ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार खा.सुप्रिया सुळे यांकडून मारहाणीचा निषेध… दरम्यान राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीहि याबाबत नाराजी व्यक्त करत कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. तर दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनीही या मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या कृतीवर योग्य ते शासन व्हावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रशांत जगताप यांनी केला निषेध.. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई नागवडे यांना भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण दुर्दैवी असून या घटनेचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र शब्दात निषेध करते. मुळात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या संस्कार व पक्षाची संस्कृती या निमित्ताने सर्वांसमोर आली असून आमचा महाराष्ट्र पोलिस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. पोलिस प्रशासनाने तात्काळ संबंधित आरोपींना अटक करत कठोर कायदेशीर पावले उचलावीत, अशी मागणी प्रशांत जगताप यांनी फेसबुक पोस्टमधून केली आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी… भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आलाच नालायक, नीच लोकांनी महिलेवर हात उचलले, गंठण तोडले, मारहाण केली.
ज्यांनी आमच्या भगिनींवर हात उचलला त्याचा हात गळ्यात बांधणारच, आम्ही जिजाऊच्या लेकी.
करार जवाब देंगे. जय जिजाऊ, जय झाशीची राणी की जय हो… अश्या शब्दांत त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.