नगरपालिकेची दौंड शहरातील कामे रेंगाळली!
समस्या, अपघातामुळे शहरातील व्यापाऱ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन

दौंड : दौंड शहरातील नगरपालिकेच्या वतीने होणारी काही कामे रेंगाळल्या ने दौंडकर नागरिकांना व व्यापाऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. या परिस्थिती विरोधात येथील व्यापारी महासंघ व मर्चंट असोसिएशन या दोन्ही व्यापारी संघटनाच्या वतीने नगरपालिकेच्या कारभाराविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनांच्या वतीने नगरपालिकेला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शहरातील शिवाजी चौक येथील प्रकाश रेडिमेड दुकाना शेजारील गल्लीतील रस्ता मागील दीड वर्षापासून नुसताच खोदून ठेवला आहे. या ठिकाणी पूर्वी नगरपालिकेचे शौचालय होते ते रस्ता कामासाठी म्हणून पाडण्यात आले आहे, शौचालयाची सोय नसल्याने नागरिक या ठिकाणी उघड्यावरच आपला कार्यक्रम उरकत आहेत. त्यामुळे येथील संपूर्ण परिसरात घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य आहे. ज्यामुळे परिसरातील नागरिकांच्या व व्यापाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. नगरपालिकेला या परिस्थितीची वारंवार माहिती देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही होत नाही. या रस्त्याचे काम नगरपालिकेने त्वरित सुरू करावे. तसेच शहरातील अष्टविनायक मार्ग रस्त्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे परंतु रस्त्यालगतच्या गटारीचे काम अद्याप अपूर्णावस्थेत आहे, यामुळे रस्त्याला लागूनच असलेल्या व्यापाऱ्यांना व त्यांच्या ग्राहकांना दुकानात येण्यासाठी कसरतच करावी लागत आहे. सदरच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी या रस्त्याला शहरातील जे रस्ते जोडलेले आहेत त्या जोड रस्त्यांची कामे तात्पुरत्या स्वरूपाची करण्यात आली आहेत. जोड रस्त्यांवरील अजबच्या चढ-उतारामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. रस्त्याच्या साईड गटर चे व जोड रस्त्यांचे काम योग्य पद्धतीने करावीत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र ओझा, मर्चंट असो.चे अध्यक्ष राजेश पाटील, विनोद ओसवाल, संतोष सातपुते, शफिक शेख, प्रताप लुंड, विवेक लुंड, प्रशांत कांबळे, विवेक सोनवणे, केदार इंगळे, श्री मुलचंदानी आदि उपस्थित होते.