अख्तर काझी
दौंड : प्रेषित हजरत मो. पैगंबर यांची जयंती या वर्षी 5 सप्टेंबरला येत आहे. मात्र दौंड शहराची हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा अबाधित राहावी तसेच शहरातील कायदा व्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनावर पडणारा कामाचा ताण कमी व्हावा या दृष्टीने यंदा दौंड शहरातील पैगंबर जयंती गणेश विसर्जनानंतर म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार असल्याचा निर्णय येथील समस्त मुस्लिम बांधवांनी एकमताने घेतला आहे. याबाबतची माहिती शाही आलमगीर मशीदीचे विश्वस्त तथा हजरत मो. पैगंबर जयंती उत्सवाचे प्रमुख युसुफ इनामदार यांनी दिली आहे.
पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आलमगीर मशीद येथे झालेल्या समाज बांधवांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीस मशिदीचे विश्वस्त युसुफ इनामदार, अनिस इनामदार, अकबर इनामदार, तसेच माजी नगराध्यक्ष बादशाह शेख, माजी नगरसेवक शहानवाज पठाण, इसामुद्दीन मण्यार, मतीन शेख, फिरोज खान, कुमेल कुरेशी, एम के बागवान व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे शहरातील गणेश मंडळे व पोलीस प्रशासनाने स्वागत केले आहे.
दि. 7 सप्टेंबर रोजी शहरात हजरत मो. पैगंबर जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंतीनिमित्ताने परंपरेप्रमाणे शाही आलमगीर मशीद येथून दुपारी 2.30 वाजता जुलूस (धार्मिक मिरवणूक) चे आयोजन करण्यात येणार आहे. या जुलूसमध्ये सहभागी होत असताना आपल्या देशाचा तिरंगा झेंडा तसेच इस्लाम धर्माचे प्रतीक असलेला हिरवा झेंडा या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही देशाचा, संघटनेचा झेंडा कोणीही वापरू नये तसेच कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य कोणीही करू नये असे आवाहन जयंती उत्सवाच्या पदाधिकाऱ्यांनी समाज बांधवांना केले आहे.
मागील वर्षी सुद्धा पैगंबर जयंती गणेश विसर्जना दिवशीच आलेली होती त्यावेळेसही मुस्लिम समाजाने पैगंबर जयंती दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचा निर्णय घेतलेला होता. गणेश विसर्जन झाल्यानंतर मंडळांनी सुद्धा लगेच आपले मांडव काढून दुसऱ्या दिवशीच्या जयंती मिरवणुकीसाठी मार्ग मोकळा करून मुस्लिम बांधवांना मोलाची साथ दिली होती. यावर्षी सुद्धा गणेश मंडळांनी मुस्लिम समाजाला अशीच साथ द्यावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.