दौंड : हजरत मो.पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने मुस्लिम बांधवांनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले. येथील शाही आलमगीर मशीद ट्रस्ट च्या मार्गदर्शनाने यंदाच्या जयंती उत्सवाचे अध्यक्ष तालीब शेख,उपाध्यक्ष आफताब सय्यद व सदस्यांनी पैगंबर जयंती उत्सवाचे आयोजन केले. परंपरेप्रमाणे जयंती निमित्ताने मुस्लिम बांधवांनी अभिवादन मिरवणूक( जुलूस) काढली.
आलमगीर मशीद परिसरातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषा परिधान करीत बच्चे कंपनी उंटांवर स्वार होत मिरवणुकीमध्ये सामील झाले होते, यंदाच्या पैगंबर जयंती उत्सवात मुस्लिम महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला.फटाक्यांची अतिशबाजी करीत मुस्लिम बांधव इस्लामचा जयघोष करीत होते. आमदार राहुल कुल, मा. आमदार रमेश थोरात, मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, इंद्रजीत जगदाळे तसेच येथील सर्वच राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी यांनी मिरवणुकीमध्ये सामील होत मुस्लिमांना शुभेच्छा दिल्या. येथील शिवाजी चौकामध्ये शिवस्मारक समितीच्या वतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. यावेळी समितीच्या वतीने पैगंबर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा आणि समाजातील ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. मिरवणूक मार्गावर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मुस्लिम बांधवांना मिठाई, आईस्क्रीम, सरबत यांचे वाटप करण्यात आले. मिरवणुकीची सांगता शाही आलमगीर मशीद येथे करण्यात आली यावेळी मौलाना मोहम्मद असलम रझा यांनी शहरातील भाईचाऱ्यासाठी व सर्वांच्या आनंदी व सुखी जीवनासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली.
शाही आलमगीर मशीद येथे कब्रस्तान कमिटीच्या वतीने, शहरातील मदरसा,मशिदींमध्ये धार्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छोटीशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. धार्मिक शिक्षणामध्ये त्यांना शिकविल्या जाणाऱ्या शिक्षणाचे सादरीकरण यावेळी विद्यार्थ्यांनी केले. या धार्मिक उपक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. कुमेल कुरेशी, राजू सय्यद, जहूर शेख, रियाज सय्यद, सैदू शेख, फैयाज सय्यद, वाहिद सय्यद, मुसा शेख, असरत शेख आदींनी आयोजन केले.