दौंड क्राईम (अब्बास शेख) : दौंड तालुक्यातील कडेठाण येथे शेतात काम करणाऱ्या लताबाई बबन धावडे या शेतकरी महिलेचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला असे आत्तापर्यंत मानले जात होते मात्र आता या घटनेतील सत्यता यवत पोलिसांनी समोर आणली असून लताबाई धावडे यांचा खून सतिलाल वाल्मिक मोरे आणि त्यांचा पुतण्या अनिल पोपट धावडे याने केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
खून करून बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूचा बनाव… आरोपी सतिलाल वाल्मिक मोरे (रा. सध्या कडेठाण, मुळ चाळीसगाव) व अनिल पोपट धावडे (रा.कडेठाण ता.दौंड) यांनी लताबाई बबन धावडे यांचा खून करून हा खून अतिशय योजनाबद्ध पद्धतीने हा खून पचवीण्याचा प्लॅन आखला होता. लताबाई धावडे यांचा मृत्यू हा बिबट्याच्या हल्ल्यात झाला असे भासविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता मात्र यवत पोलिसांनी अतिशय गुप्त पद्धतीने तपास करत यातील आरोपिंना जेरबंद केले आहे. अनिल धावडे हा कडेठाण चा उपसरपंच असून त्यानेच साथीदाराच्या मदतीने हा खून करून बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव रचल्याचे आता उघड झाले आहे.
नेमकं काय घडलं होतं… महिला शेतकरी लताबाई बबन धावडे (रा. कडेठाण. ता.दौंड. जि.पुणे) या दि. 7 डिसेंबर 2024 रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या शेतामध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असावा असे मानले जात होते. मात्र त्या ज्या जागी खुरपत होत्या तेथून लांब अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला होता तसेच त्यांच्या मृतदेहाशेजारी रक्ताने माखलेला दगड दिसत असल्याने पोलिसांचा संशय बळावत होता. मात्र अतिशय गुप्तपद्धतीने पोलिसांनी तपास करून अखेर या खूनाच्या घटनेला वाचा फोडलीच.
अहवाल आला अण तपासाची चक्रे गतिमान झाली… या घटनेतील फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजि. नं २४८/२०२५ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये मयताचा तपास करीत असताना तपासात मयतास कोणत्याही वन्य प्राण्याने हल्ला करून मृत्यु झाला नसले बाबतचा, प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपुर यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे या घटनेचा सखोल तपास सुरु केला असता बाजुस नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपीतांनी आपसात संगनमत करून लताबाई धावडे यांचा खून करण्याचा कट रचुन त्यांचे तोंड व डोके दगडाने ठेचुन त्यांचा खून केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.संपांगे हे करीत आहेत.






