सांगली (सुधीर गोखले) : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सुसलाद या गावात बुधवारी रात्री च्या सुमारास पतीने पत्नीला दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ललिता कल्लापा कांबळे (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे तर संशयित पती कल्लापा इराप्पा कांबळे (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भीमण्णा मारुती कांबळे यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित कल्लापा इराप्पा कांबळे याला पोलिसांनी रात्री उशिरा सुसलाद येथील एका घरातून ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी संशयित कल्लापा कांबळे हा गावातच आंबेडकर नगर परिसरात राहतो, वर्षभरापासून तो पत्नी मयत ललिताशी पिऊन भांडण करत होता बुधवारी रात्री सुद्धा तो दारू पिऊन ललिताशी भांडण करू लागला त्यांची मुले जेवण करून झोपी गेल्यावर रात्री झोपेतच त्याने ललिताच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केले.
रात्री पाणी पिण्यासाठी मुले उठली असता आपली आई रक्ताच्या थारोळ्यात पाहून मुले रडू लागली. या आवाजाने आजू बाजूच्या लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. तातडीने पोलिसांना कळवले असता विभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आरोपीला पकडण्यासाठी सूचना केल्या. खुनानंतर संशयित कल्लापा कांबळे गावातीलच एका टेरेसवर लपला होता. रात्री उशिरा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्यावेळीही तो नशेत होता. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार करत आहेत.