पुणे : विरोधातील टोळीला माहिती पुरवत असल्याच्या संशयावरून एका अल्पवयीन मुलाला सासवड येथे नेऊन त्याचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत कोंढवा पोलिसांनी दहा ते अकरा जणांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.
या अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणी साईराज लोणकर (रा. कोंढवा खुर्द), ओंकार कापरे ( रा. कोंढवा) यांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार वरील दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खून झालेला अल्पवयीन मुलगा हा ढोल ताशा सरासावासाठी घरातून बाहेर पडला होता तो दुसर्या दिवशीही घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी कोंढवा पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असता त्या अल्पवयीन तरूणाचा एक मित्र गायब झाल्याचे आणि नंतर तो घरी परतल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन चौकशी केली असताना त्याच्या पायाला लागल्याचे त्यांना दिसले.
महत्वाचे व्हिडीओ, बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट करा https://youtube.com/@Sahkarnama?si=pl3Wv3XeOJvzHT5A
पोलिसांनी त्याला याबाबत विचारले असता वरील आरोपींनी त्याला व त्याच्या मित्राला असे दोघांनाही मारहाण केली असल्याचे त्याने सांगितले. तसेच लोणकर, कापरे व त्यांच्या इतर साथीदारांनी त्या अल्पवयीन मुलाला सासवडला नेले आणि त्या ठिकाणी त्याला गंभीररित्या मारहाण करत त्याचा खून केल्याचे उघड झाले. कोंढवा पोलिसांनी वरील दोघांना अटक केली असून त्यांच्या इतर दोन अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतले आहे.