यवत मध्ये भाच्याकडून मामाचा खून

दौंड : दौंड तालुक्यातील यवत येथे भाच्याकडून मामाला जबर मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या मारहाणीनंतर उपचार सुरु असणाऱ्या मामाचा अखेर मृत्यू झाला आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात मारहाणीची फिर्याद दाखल असून त्यामध्ये आता वाढीव खुनाचे कलम लावण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 04/05/2025 रोजी रात्री 10:15 वाजता यवत गावच्या हद्दीमध्ये आरोपी प्रसाद सुनिल नलावडे (वय 24,रा.यवत) याने त्याचे मामा नितीन खैरे (वय 45, रा.यवत) यांना जबर मारहाण करत त्यांच्या डोक्यामध्ये दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले होते. यावेळी त्यांची पत्नी निर्मला खैरे ह्या त्यांच्या डी.बी मेडीकलमध्ये बसल्या असताना त्यांना याची माहिती अविनाश निगडे यांनी दिली होती.

यावेळी निर्मला खैरे यांनी यवत येथील बिकानेर स्वीट होम समोर जाऊन पाहिले असता त्यांचा भाचा प्रसाद नलावडे याने त्यांच्या पतीला जबर मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचे आणि त्यांची करंगळी तुटल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पतीला वाय.सी-एम हॉस्पीटल, पिंपरी चिंचवड येथे उपचारकामी ॲडमिट केले होते आणि यबाबत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

मारहाणीत जखमी झालेले नितीन खैरे यांच्यावर उपचार सुरु असताना आज दिनांक 22 मे रोजी त्यांचा मृत्यू  झाला आहे. त्यामुळे आरोपी प्रसाद नलावडे याच्यावर वाढीव कलमानुसार खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला दिनांक 5 मे रोजीच अटक करण्यात आली होती. घटनेचा अधिक तपास यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.