Murder – ‛खुनाचे’ कुठलेही धागेदोरे हाती नसताना ‛दौंड पोलिसांनी’ केला तरुणाच्या ‛किचकट’ खुनाचा उलगडा! मित्रांनीच केला होता, मित्राचा खून, दौंड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी



– सहकारनामा

दौंड : (अख्तर काझी)

दौंड तालुक्यातील खानोटा गावातील भीमा नदी पात्र मध्ये दौंड पोलिसांना एका अनोळखी तरुणाचा प्लास्टिक पट्ट्यांनी बांधलेला मृतदेह आढळून आला होता. दौंड पोलिसांनी अवघ्या 33 दिवसांमध्ये तांत्रिक तपासाच्या मदतीने या अज्ञात तरुणाच्या खुनाचा उलगडा करून आरोपींना जेरबंद केले. प्रशांत उर्फ हर्षद लक्ष्मण निंबाळकर (वय,24,रा. गणेगाव दुमाला, तालुका शिरूर जिल्हा पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मनोज उर्फ मारुती प्रकाश निंबाळकर(रा. गणेगाव दुमाला,ता. शिरूर), सतीश काशिनाथ भोसले(रा. वरवंड तालुका दौंड), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सागर नवनाथ दाभाडे(रा. गणेगाव दुमाला, ता. शिरूर) हा आरोपी फरार आहे.

घटनेबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती  अशी की,दि.5 मार्च 2021 रोजी तालुक्यातील खानोटा गावातील अण्णासाहेब भोसले यांच्या जमिनी लगतच्या भीमा नदी पात्रामध्ये एका अनोळखी युवकाचा मृतदेह दौंड पोलिसांना मिळवून आला होता. खानोटा गावचे पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसात खूनाच्या गुन्ह्याची नोंद झाली होती. गुन्ह्याबाबत वरिष्ठांना कळविल्यानंतर पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपअधीक्षक राहुल धस, परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक मयूर भुजबळ व पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठांनी गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना केल्या. वरिष्ठांच्या सूचने प्रमाणे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दौंड पोलिसांचे पथक तयार केले व तपासास सुरुवात केली.

 मयत अनोळखी असल्याने व त्यास ओळखणारे कोणीही पुढे न आल्याने मयताची ओळख पटविण्या मध्ये अडचणी येत होत्या. परंतु दौंड पोलिसांनी मयताच्या अंगावरील असलेल्या कपड्यांच्या कंपनी मार्क वरून तपास सुरू केला. मयताची ओळख पटविण्यासाठी पुणे, अहमदनगर व आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मयताचे फोटो पाठविण्यात आले. खून झालेल्या युवकाच्या वर्णनाचे कोणी हरविले आहे किंवा अपहरण झाले आहे का याची माहिती दौंड पोलिसांनी घेतली. 

परंतु काहीही माहिती हाती लागत नाही हे पाहून पोलिसांनी तपासाची दिशा बदलली व पुणे- सोलापूर रस्त्यावरील ढाबे,ग्राम पंचायत कार्यालये, कुरकुंभ औद्योगिक वसाहत परिसर व मुख्य चौकांमध्ये मयताचे फ्लेक्स पोलिसांनी लावले. यादरम्यान या मौजे गणेगाव दुमाला(ता. शिरूर) येथील एक मुलगा एक महिन्यापासून हरविला असल्या बाबतची माहिती पोलीस निरीक्षक सचिन पाटील व पोलीस कॉन्स्टेबल अमोल गवळी यांना मिळाली आणि या घटनेच्या तपासाला ही दिशा मिळाली. 

तपास पथकाने त्वरित हरविलेल्या व्यक्तीचे नातलग स्वप्निल निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला व त्यांना दौंड पोलीस स्टेशन मध्ये आणून मयताचे फोटो व कपडे दाखविले असता मयत हा त्यांचा भाऊ प्रशांत उर्फ हर्षद निंबाळकर असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की मयत प्रशांत हा दि 1 मार्च रोजी गावातील मनोज उर्फ मारुती प्रकाश निंबाळकर याच्यासोबत मोटार सायकल वरून भुलेश्वर येथे देवदर्शनासाठी गेला होता व त्या दिवशी त्यांच्यासोबत त्याचे मित्र सतीश भोसले व सागर दाभाडे हेसुद्धा होते. 

नातलगा ने सांगितलेल्या माहितीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता मयत व त्याच्या बरोबरचे त्याचे तीन मित्र पाटस येथील एका हॉटेलमध्ये दारू पीले होते व त्याठिकाणी यांच्यामध्ये भांडणे झाल्याची महत्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्वरित संशयित आरोपी मनोज उर्फ मारुती निंबाळकर यास दि. 7 एप्रिल रोजी ताब्यात घेतले, पोलिसी खाक्या दाखविताच त्याने मयता बरोबर भांडण झाल्याची व मित्र सतीश भोसले व सागर दाभाडे यांना सोबत घेऊन प्रशांत याचा खून केल्याचे कबूल केले. 

खुनातील इतर आरोपींचा शोध सुरू असतानाच खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून दिनांक 10 एप्रिल रोजी खुनातील आणखी एक आरोपी सतीश भोसले याला भिगवन येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता मनोज निंबाळकर व सागर दाभाडे यांच्या मदतीने जुन्या भांडणाच्या कारणावरून प्रशांत  निंबाळकर यास दिनांक एक मार्च रोजी दौंड पाटस रोडवर मारहाण केली असे सांगितले.

त्यानंतर आरोपी सतीश भोसले व सागर दाभाडे यांनी त्याला दुचाकीवरून बसवून डिकसळ(ता. इंदापूर) येथील भीमा नदीच्या पुलावर आणले त्या ठिकाणी त्यांनी मयताचे दोन्ही हात व पाय प्लास्टिक पट्ट्यांनी बांधले व त्यास नदीपात्रात टाकून त्याचा खून केला. या  खून प्रकरणातील दोन आरोपींना अटक झाली असून तिसरा आरोपी सागर दाभाडे याचा पोलीस तपास करीत आहे. 

पोलीस  निरीक्षक सचिन पाटील, सहाय्यक  पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहाय्यक फौजदार दिलीप भाकरे, पोलीस हवा. आसिफ शेख, पांडुरंग थोरात, पोलीस ना. सचिन बोराडे, किरण राऊत, अण्णासाहेब देशमुख, अमोल गवळी, अमोल देवकाते, नारायण वलेकर, आदेश राऊत, रवी काळे, किरण डुके यांच्या तपास पथकाने कामगिरी बजावली.