दौंड : दौंड कुरकुंभ मार्गावरील मेरगळ वाडी हद्दीत दौंड पोलिसांना एक बेवारस मृतदेह मिळून आला होता. मयताच्या डोक्यामध्ये मारहाणीच्या खुणा असल्याने हा घातपाता चा प्रकार दिसत आहे असा पोलिसांना संशय आला आणि पोलीस निरीक्षक विनोद घुगे व पोलीस पथकाने त्या दिशेने योग्य तपास करून सदरच्या खून प्रकरणाचा छडा लावत मुख्य आरोपीला गजाआड केले आहे. राजेंद्र गणपत शिंदे(वय 34,रा. लक्ष्मी नगर,गवळीवाडा, दौंड) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे.उमेश गुरबळ आप्पा बनजगोल (वय 52,रा. गजानन सोसायटी, दौंड) यास खूनप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
दौंड पोलिसांच्या माहितीनुसार, दौंड कुरकुंभ मार्गावरील मेरगळवाडी हद्दीत दिनांक 25 मार्च रोजी एक बेवारस मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन अनोळखी मृतदेह ताब्यात घेतला. मयताच्या डोक्यावर मारहाणीच्या खूणा असल्याने या व्यक्तीचा कोणीतरी खून करून या ठिकाणी आणून टाकले असावे किंवा त्याला या ठिकाणी आणून त्याचा खून करण्यात आला असावा असा संशय पोलिसांना होता. त्यामुळे प्रथम मयताची ओळख पटविणे अत्यंत जरुरीचे होते. दौंड पोलिसात मात्र एखादी व्यक्ती बेपत्ता असल्याची नोंद नव्हती त्यामुळे दौंड पोलिसांनी जवळपासच्या पोलीस ठाण्यात एखाद्या बेपत्ता व्यक्तीची नोंद आहे का याची माहिती घेतली मात्र कोठूनच आवश्यक असलेली माहिती मिळाली नाही. मयताची ओळख पटत नसल्याने तीन दिवसानंतर पोलिसांनी मयताचा बेवारस म्हणून अंत्यविधी केला. आणि दिनांक 31 मार्च रोजी येथील ज्ञानेश्वर शिंदे, सत्यभामा गणपत शिंदे यांनी त्यांच्या घरातील व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती दौंड पोलिसांना दिली. पोलिसांच्या ताब्यातील मयत व्यक्तीचे वर्णन व अंगावरील खुणा, व इतर वस्तू या शिंदे यांच्या बेपत्ता झालेल्या व्यक्तीशी तंतोतंत जुळत असल्याने व मयताकडे सापडलेली घराची चावी त्यांच्या कुटुंबाने ओळखल्याने मयत व्यक्ती हीच राजेंद्र गणपत शिंदे असल्याचे निष्पन्न झाले. तसेच मयत राजेंद्र व त्याची पत्नी आरोपी उमेश याच्याकडे गवंडीकाम करावयाचे हा महत्त्वाचा दुवा मिळाल्याने पोलिसांच्या तपासाला योग्य दिशा मिळाली आणि या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडणे शक्य झाले. पोलिसांच्या तपासामध्ये आरोपी उमेश याने,आपणच दि. 23 मार्च रोजी राजेंद्र यास आपल्या दुचाकीवर बसून मेरगळवाडी परिसरात नेऊन त्यास दारू पाजून त्याच्यावर लोखंडी हत्याराने वार करून खून केल्याची कबुली दिली आहे. आरोपी आणि मयताची पत्नी यामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय या खून प्रकरणांमध्ये येत असून या मध्ये राजेंद्र शिंदे याचा अडसर येत असावा त्यामुळे आरोपीने आपल्या मार्गातील अडसर दूर करण्याच्या उद्देशाने त्याचा खून केला असावा असा संशय पोलिसांना आहे. या खून प्रकरणामध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा तपास दौंड पोलीस करीत आहेत. आरोपी उमेश यास न्यायालयासमोर हजर केले असता 11 एप्रिल पर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुणे जिल्हा ग्रामीणचे पो. अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड चे पो. नि. विनोद घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, सहा. पो. फौजदार डी. जी. भाकरे, पोलीस कर्मचारी पांडुरंग थोरात, सुभाष राऊत, अमोल गवळी, अमीर शेख ,विशाल जावळे ,निखिल जाधव, अमोल देवकाते, सचिन बोराडे, आदेश राऊत यांच्या पथकाने कामगिरी बजाविली.