रात्रीच्या अंधारात नगरपालिकेची मुतारी जमीनदोस्त, दौंडमध्ये एकच चर्चा… मुताऱ्या नेमकं पाडतंय कोण..?

दौंड (अख्तर काझी) : शहरात सार्वजनिक शौचालयाचा (मुतारी) प्रश्न ऐरणीवर असतानाच शहरातील आणखीन एक मुतारी (भाजी मंडई प्रवेशद्वारा जवळील) रात्रीच्या अंधारात जमीन दोस्त करण्यात आली आहे. सदर नगरपालिकेची मुतारी नगरपालिकेने स्वतः पाडली की आणखीन कोणी असा प्रश्न दौंडकर उपस्थित करीत आहेत.

शहरातील नगरपालिकेच्या असलेल्या अनेक मुताऱ्या काही ना काही कारणास्तव पाडण्यात आल्या आहेत. शहरात मुतारी नसल्याने शहरात किंवा बाजारपेठेत कामानिमित्ताने येणाऱ्या महिलांची मोठी कुचंबना होत असून पुरुषांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत मुतारी नसल्याने नागरिकांनी बाजारपेठेच्या जवळच असणाऱ्या पोलीस वसाहतीलाच मोठी मुतारी बनविली आहे. या सर्व प्रकारामुळे येथील राजकारणी व विशेषतः नगरपालिकेला टीकेला सामोरे जावे लागत आहे.

न.पा. चे मुख्याधिकारी म्हणून विजय कावळे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी त्यांची भेट घेत त्यांना शहरातील शौचालयांचा प्रश्न तातडीने सोडविण्याविषयी सुचविल्यानंतर मुख्याधिकारी यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन नगरपालिकेच्या भाजी मंडई मधील शौचालय आणि गांधी चौकातील नगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या इमारतीमधील शौचालय त्यांनी स्वच्छता व रंगरंगोटी करून पुन्हा चालू केले व लवकरच शहरातील पाडण्यात आलेल्या मुताऱ्या सुद्धा लवकरच पुन्हा बांधण्यात येतील असे आश्वासन दौंडकरांना दिले आहे.

परंतु शौचालय बांधण्या ऐवजी पाडण्याचीच घटना उघडकीस आली आहे. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे हे शौचालय (मुतारी) पाडले गेले आहे याची माहितीच नगरपालिकेला नाही. आमच्या प्रतिनिधीने नगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक यांना सदर घटनेबाबत विचारले असता, मी या ठिकाणी नव्याने रुजू झाली आहे, हा प्रकारच घडलेला मला माहिती नाही असे उत्तर त्यांनी दिले आहे. नगरपालिकेने जर ही उतारी पाडलेली नाही तर मग रात्रीच्या अंधारात ही मुतारी नक्की कोणी आणि का पाडली असा प्रश्न दौंडकर उपस्थित करीत आहेत. शहराच्या या प्रश्नावर गांभीर्याने बोलणारे मुख्याधिकारी कावळे या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.