– सहकारनामा
मुंबई : संपूर्ण देशात सध्या कोरोना प्रादुर्भाव वाढत चालला असून कोरोनाच्या आलेल्या या दुसऱ्या लाटेला फक्त मोदी सरकार आणि निवडणूक आयोगच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आला आहे.
सामनाच्या अग्रलेखात संपादकांनी लिहिताना कोरोनाच्या पहिल्या लाटेला चीनला जबाबदार धरले होते मात्र देशात आलेल्या या दुसऱ्या लाटेला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबबादार आहेत असा गंभीर आरोपच सामनातून करण्यात आला आहे.
या अग्रलेखात मत मांडताना केवळ 24 तासांत देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखांवर गेली तरीही देशात निवडणुकांच्या सभा आणि धार्मिक कुंभमेळे काही थांबायला तयार नसल्याचे नमूद करण्यात आले असून हरिद्वार येथे लाखो लोक, भाविक कुंभ मेळ्याच्या निमित्ताने एकत्र आले आणि त्यांच्याकडून शाहीस्नानही करण्यात आले त्यामुळे कोरोनाचा संसर्ग संपूर्ण देशात पसरला. तर दुसरीकडे पश्चिम बंगाल मधील निवडणुकांच्या सभा, मेळावे, देशाचे प्रधानमंत्री थांबवायला तयार नाहीत त्यामुळे कुंभ मेळ्यात आलेल्या साधूंना, भक्तांना तरी का दोष द्यायचा असे लिहिताना कोरोना वाढता प्रादुर्भाव केंद्र सरकार गांभीर्याने घेत नाहीये, आणि उलट पश्चिम बंगाल मधून ‘कोरोना’ चा संसर्ग घेऊन भाजप कार्यकर्ते आपापल्या राज्यांत येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जगात आणि देशात पसरलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेचे खापर सरकारने चीनवर फोडले होते पण आता मात्र जी दुसरी लाट आली आहे, आणि त्याचे जे वादळ उठले आहे त्यास आता चीन जबाबदार नसून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच आहे असा सनसनाटी आरोप सामनातून करण्यात आला आहे.