मुंबई : सहकारनामा
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्र्यांना जे पत्र ईमेल आयडीवरून पाठविण्यात आले होते त्या ईमेल आयडीबाबत शंका उपस्थित केली जात होती, मात्र आता तो ईमेल आयडी माझाच आहे अशी माहिती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.
परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटविल्यानंतर त्यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. ते पत्र लिक झाल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि पोलिसांना महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले असा गौप्यस्फोट त्यांनी या पत्रात केला होता.
या गौप्यस्फोटानंतर विरोधी पक्षनेतेए देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली.तर राज ठाकरे यांनीही या कृतीचा खरपूस समाचार घेतला. मात्र जे पत्र मेल आयडीवरून पाठविण्यात आले होते तो इमेल आयडी परमबीर सिंग यांचा नसल्याची शंका उपस्थित केली जात होती आणि त्या पत्रावर शंका घेतली जात होती.
मात्र परमबीर सिंग यांनी एएनआय वृत्तसंस्थेला माहितीदेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवेलं पत्र माझ्याच ई-मेल आयडीवरुन पाठवले असल्याचे सांगितले आहे. परमबीर सिंग यांची आलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा स्फोटक स्थिती निर्माण झाली असून आता याबाबत राज्यसरकार पुढे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.