दौंड | नियोजित बुद्ध विहाराच्या रेंगाळलेल्या कामाविरोधात दलित संघटनांचे आंदोलन, अनेक मान्यवरांची आंदोलनस्थळी दिली भेट

अख्तर काझी

दौंड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या शहरातील नियोजित बुद्ध विहाराचे काम गेली कित्येक वर्ष रेंगाळले आहे. सदर कामाच्या ठेकेदाराला कामाचे पैसे अदा झाले असतानाही तो काम करीत नाही आणि तरीही नगरपालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

जाणीवपूर्वक बुद्धविहाराचे काम पूर्ण केले जात नाही असा आरोप करीत, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित सोनवणे, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे तालुका अध्यक्ष सागर उबाळे, भीम वॉरियर्स संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद राणेरजपूत यांच्या पुढाकाराने येथील दलित संघटनांनी पुन्हा एकदा शहरातील संविधान स्तंभ परिसरात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

दौंड शहरामध्ये दलित समाज मोठ्या संख्येने आहे  त्यामुळे शहरात सर्व सोयी सुविधा असलेले एक मोठे बुद्ध विहार असावे या शुद्ध हेतूने आमदार राहुल कुल यांनी बुद्ध विहार व्हावे यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला व या कामासाठी तब्बल 3 कोटी 82 लाख रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करून आणला. नगरपालिकेच्या वतीने कामाची निविदा काढण्यात आली. ठेकेदार सुद्धा ठरला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन पार पडले. आणि बुद्ध विहाराच्या कामास (2019-20) सुरुवात झाली.

परंतु आज पाच वर्षानंतर सुद्धा काम अपूर्ण अवस्थेतच बंद ठेवण्यात आले आहे. या विरोधात दलित संघटनांनी आवाज उठवीत आंदोलनाला सुरुवात केली आहे. नगरपालिकेने संबंधित ठेकेदारास नोटीस पाठवून काम सुरू करण्याच्या सूचना केलेल्या आहेत असे सांगितले जात आहे, तर नगरपालिका कामाचे बिल देत नाही अशी तक्रार ठेकेदार करीत आहे. ठेकेदाराला आत्तापर्यंत केलेल्या कामाचे 1 कोटी 10 लाख रुपये अदा केले आहे असे नगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे मग बुद्ध विहाराचे काम का थांबले आहे? असा प्रश्न दलित संघटनांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बुद्ध विहाराच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु या कामास संघटनांनी विरोध दर्शविला आहे. बुद्ध विहाराचे काम थांबवुन सुरू करण्यात आलेले संरक्षक भिंतीचे काम त्वरित थांबविण्यात यावे, जोपर्यंत बुद्ध विहाराचे काम होत नाही तोपर्यंत सदरचे काम करू नये अशी मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा आणखीन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला आहे.

या आंदोलन ठिकाणी दौंडचे आमदार राहुल कुल, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, माजी नगराध्यक्ष बादशहा शेख, इंद्रजीत जगदाळे, जेष्ठ माजी नगरसेवक नंदू पवार तसेच येथील मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनास भेट दिली आहे.