2011 ते 21 पर्यंत दरवर्षी ओबीसींची थेट भरतीच्या माध्यमातून 27% पेक्षा जास्त नियुक्ती – केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

OBC

ओबीसींची थेट भरतीच्या माध्यमातून  2011 ते 2021 या कालावधीत दरवर्षी 27% पेक्षा जास्त नियुक्ती झाल्याचे केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले.

केंद्र सरकारची विविध मंत्रालये/विभाग, त्यांच्या संलग्न/अखत्यारीतील कार्यालयांनी दिलेल्या माहितीवर आधारित ही आकडेवारी आहे असे त्यांनी सांगितले. इतर मागासवर्गीय (ओबीसी) लोक केंद्रीय सेवांमध्ये 27 टक्के आरक्षणाचा लाभ मिळवण्यात मागे आहेत का, या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे.

रिक्त पदे भरणे ही निरंतर प्रक्रिया आहे असे ते म्हणाले. उपसचिव दर्जाच्या आणि त्याहून अधिक दर्जाच्या अधिकाऱ्याला संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त करावे, जेणेकरून आरक्षणाशी संबंधित आदेशांचे आणि सूचनांचे योग्य पालन व्हावे अशा सूचना कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने केंद्र सरकारच्या मंत्रालयांना/विभागांना जारी केल्या आहेत. त्यांना कर्तव्य पार पाडण्यासाठी मदत करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्याच्या थेट नियंत्रणाखालील विशेष आरक्षण कक्ष असेल असेही त्यांनी सांगितले.