यांनी भाजपची डस्टबिन केली | बलात्कारी, भ्रष्टाचाऱ्यांना क्लीनचिट ही ‘मोदींची’ खरी गॅरंटी – दौंडमध्ये ‘सुषमा अंधारे’ कडाडल्या

अख्तर काझी

दौंड : देशात मोठ मोठाले घोटाळे करून भ्रष्टाचार करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना भाजपामध्ये आल्यानंतर क्लीनचीट दिली जाते, नरेंद्र मोदी बलात्काऱ्यांना सुद्धा क्लीन चीट देतायत. ‘ये मोदी की गॅरंटी है क्या’? असा भाजपावर घणाघात करून, भाजपाची यांनी डस्टबिन केली असे शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ दौंड येथे आयोजित सभेत अंधारे बोलत होत्या. यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना, काँग्रेस ,आम आदमी तसेच घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

विविध व्हिडीओ पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा

सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपाने आपल्या फक्त नऊच मंत्र्यांची किंवा नेत्यांची नावे सांगावीत की त्यांच्या घरांवर ईडीची धाड पडली. माधुगिरी मागून खातात का हे सगळे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अरे देशातील अशी नऊ राज्य दाखवा जिथे अल्पसंख्याकांवर एकही अत्याचार झाला नाही. याची उत्तरे मोदी आणि त्यांच्या भक्तूल्यांनी द्यावीत. ही निवडणूक महत्त्वाची आहे, फक्त सुप्रिया सुळे यांना खासदार करायचे आहे यासाठी ही निवडणूक महत्त्वाची नाही, ही निवडणूक महत्त्वाची आहे कारण देशातले संविधान धोक्यात आहे. मोदींचे भक्त सांगत आहेत की आम्हाला संविधान बदलायचे आहे, यांचीच लोक सांगतात की जर आता भाजपा निवडून आली तर पुन्हा निवडणूक होईल हे विसरून जा. भाजपा आपल्या जाहीरनाम्यात सांगते की आमचा अजेंडा वन नेशन वन इलेक्शनचा आहे. म्हणजे आम्ही एकच हुकुमशहा निवडू.

लोकसभा, विधानसभा इतर स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत हे कोण सांगतय तर भाजपा वाले सांगत आहे. याउलट महाविकास आघाडी सांगते की, वन नेशन वन इलेक्शन नको तर वन नेशन वन एज्युकेशन चा आमचा अजेंडा आहे. भाजपा म्हणते आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतो आहोत, ही मोदींची गॅरंटी आहे. परंतु जितना बडा भ्रष्टाचार उतनी बडी एन्ट्री ये है मोदी की गॅरंटी असेही अंधारे म्हणाल्या.

व्हिडीओ पहा व्यक्त व्हा

विरोधकांना, कार्यकर्त्यांना भाजपाकडून दमदाटी केली जात आहे. परंतु अशी दमदाटी म्हणजे पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे. देशातील युवा पिढीच्या हातात ड्रग्ज च्या पुड्या देणारे सरकार बदलायचे आहे हे लक्षात घ्या. देशातील ज्या भागातील मतदान झाले आहे तेथील गोपनीय अहवाल भाजपा विरोधातील आहे. निवडणूक आपल्या हातून जात आहे हे लक्षात आल्याने मोदी व त्यांचे भक्तूल्ले बिथरले आहेत, त्यांनी आत्तापर्यंत केलेला हिंदू -मुस्लिम किंवा मराठा -ओबीसी वाद यांचा त्यांना काही फार फायदा होताना दिसत नाही त्यामुळे सरकारी यंत्रणांची दडपशाही सुरू आहे. त्यांना हाताशी धरून निवडणुकीच्या काळातही कारवाया चालू आहेत.

आपल्याला मोदीजींना पंतप्रधान बनविण्यासाठी मतदान करायचे आहे असे त्यांचे भक्त सांगतात. पण कशापायी बाबा, का जीवाची आबदा करून घ्यायची हे सांगितले पाहिजे ना त्यांनी. मोदींनी शब्द दिला होता प्रत्येक वर्षी दोन करोड बेरोजगारांना रोजगार दिला जाईल, आता जे मोदींसाठी मत मागत आहेत त्यांनी सांगावे बेरोजगारांना रोजगार मिळाला का? मोदींचा शब्द होता प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देऊ, आता त्यांनी सांगितले पाहिजे की बाबा 15 लाख रुपये देऊ शकलो नाही, मी तुम्हाला 5-10 लाखच दिले आहेत, उरलेले पाच लाख रुपये देण्यासाठी मला पंतप्रधान करा असे मोदींनी म्हणावे की नाही. आता भाजपच्या लोकांनी हे म्हटले तर आपण समजू शकतो, परंतु ज्यांना आठ जागा मिळाल्या आहेत त्यांनी 48 जागांचा प्रचार करायचा, ज्यांना फक्त चार जागा मिळाल्या आहेत त्यांनी सुद्धा 48 जागांचा प्रचार करायचा, ज्यांना जागाच मिळाली नाही तरीही त्यांनी हाच प्रचार करायचा, याला काही अर्थ आहे का? उगाच बेगाने शादी मे हम क्यू दिवाने बन रहे है, हे या लोकांना( घटक पक्ष) समजत नाही.

अंधारे पुढे म्हणाल्या की, धर्माच्या आधारावर महागाई कमी-जास्त होत नाही, महागाईचा फटका सगळ्यांना बसतो आहे आणि त्या महागाईवर चकार शब्द हे मोदी भक्त बोलत नाहीत. दादा (अजित पवार ) म्हणतात की, ही निवडणूक ते लोक भावनिक करतील, भावनिक होऊ नका, डोक्याने काम करा आणि विचार करा. दादा खरेच बोलले आहे निवडणूक भावनिक नाही झाली पाहिजे, मग दादा तुम्ही अशी नऊ स्मार्ट शहरे सांगा की ती खरीच स्मार्ट सिटी झालेली आहेत. नऊच खासदारांची गावे सांगा की त्यांनी ती दत्तक घेतली व त्यांचा कायापालट केला, नऊ जिल्हे दाखवा की ज्या जिल्ह्यांमध्ये नवीन सरकारी रुग्णालयाचे विस्तारीकरण झाले आणि सगळ्या प्रकारच्या सुविधा तिथे सुरू झाल्या आहेत, तुम्ही नऊ बँक शाखा सांगाव्यात की ज्या बँकांमध्ये जनधन खाते उघडले आणि त्याच्यामध्ये 15-15 लाख रुपये आले आहेत.

नऊ जिल्हे दाखवा जिथे किमान एक लाख नोकऱ्या मिळाल्या आहेत. नऊ राज्य सांगा जिथे नवीन वीज प्रकल्प आलेले आहेत. दादा तुमच्या मंत्रिमंडळातील नऊच मंत्री सांगा की ज्यांची मुले सरकारी शाळेत शिकली आहेत किंवा शिकत आहेत. नऊ राज्य, किंवा जिल्हे सांगावे जिथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या नाहीत. नवामी गंगे -नवामी गंगेचा जो फार उदो उदो ते करतात त्यांनी नऊ किलोमीटर परिसर दाखवावा जिथे गंगा प्रचंड स्वच्छ झाली आहे. भाजपाचे फक्त नऊ लोक सांगावीत की ज्यांच्यावर बलात्काराचे आणि लैंगिक शोषणाचे आरोप झाले आणि त्यांना मोदी सरकारच्या काळात शिक्षा झाली. नऊ सरकारी विभाग सांगावा जिथला भ्रष्टाचार मुळापासून संपला आहे. रोजच्या जगण्यातले नऊ खाद्य सांगावे( मिठा सहित) ज्यांचे दहा वर्षात भाव अजिबात वाढले नाहीत.नऊ संसदेची अधिवेशने सांगा जिथे खरेच जनतेची कामे झाली, देशातली नऊ राज्य दाखवा जिथे भाजपाने पैसे देऊन आमदार- खासदार विकत घेतले नाहीत, किंवा फोडले नाहीत. पंतप्रधानांनी हिंदू मुस्लिम न करता फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर मते मागितली असतील अशी त्यांनी नऊ राज्य सांगावी, यावर कोणीही मोदी भक्त बोलायला तयार नाही असेही शेवटी सुषमा अंधारे म्हणाल्या.