दौंड : दौंड नगरपालिका हद्दीतील दोन मोबाईल टॉवर नगरपालिकेने आज सील केले आहेत. मोबाईल टॉवर मालमत्ता कर वसुली, थकबाकी वसुली करणेकामी संबंधित टॉवर एजन्सीला( इंडस) वारंवार सूचना करून सुद्धा त्यांनी नगरपालिका थकबाकी करांची रक्कम न भरल्यामुळे दौंड नगरपालिकेच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कंपनीच्या अखत्यारीतील एकूण आठ मोबाईल टॉवरची थकबाकी व चालू मागणी(17 लाख 50 हजार रु) कर न भरल्यामुळे शहरातील नवगिरे वस्ती व पानसरे वस्ती येथील मोबाईल टॉवर नगरपालिकेने सध्या बंद केले आहेत. शहरातील इतर टॉवर व नगरपालिका करांचे मोठे थकबाकी असणारे मालमत्ता धारक यांच्यावर सुद्धा जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिका वसुली विभाग प्रमुख हनुमंत गुंड व आरोग्य निरीक्षक शामराव पाटील यांनी दिली. हनुमंत गुंड, शामराव पाटील,सागर सोनवणे, प्रवीण खुडे, नितीन तूपसौंदर्य यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला होता.
शहरातील मोबाईल टॉवर सील केल्याने आता नागरिकांचे मोबाईल रेंज विना बंद पडतात की काय अशी चिंता येथील मोबाईल धारकांना लागली आहे.