मनसे महायुती उमेदवारांचा प्रचार करणार – अ‍ॅड. सुधीर पाटसकर

अख्तर काझी

दौंड : संपूर्ण देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. महाराष्ट्रातही महायुती व महाविकास आघाडीने आपापल्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांची महायुती झाली आहे, तर मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस या पक्षांची महाविकास आघाडी झाली आहे.

राज्यात महाविकास आघाडी व महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत प्रचार सुरू आहे. निवडणुकीमध्ये राज्यातील 48 जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकता याव्यात म्हणून महायुती व महाविकास आघाडी कडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विविध पक्षांकडून, संघटनांकडून पाठिंबा मिळविला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या भूमिकेला धरून राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघासाठी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचे नेते व सरचिटणीस यांची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

लवकरच मनसेच्या सर्व अंगीकृत संघटनांचा व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन राज ठाकरेंच्या आदेशानुसार संबंधित लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात मनसे सहभागी होईल असे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पाटसकर यांनी सांगितले.
पक्षाचे समन्वयक…..
पुणे- अमित ठाकरे, राजेंद्र वागस्कर, किशोर शिंदे, बाळा शेडगे.
शिरूर- राजेंद्र वागस्कर, अजय शिंदे
मावळ- नितीन सरदेसाई, रणजीत शिरोळे ,अमेय खोपकर
बारामती/ सोलापूर/ माढा- दिलीप धोत्रे,ऍड. सुधीर पाटसकर.