|सहकारनामा|
मुंबई : राष्ट्रकुल संसदीय मंडळाद्वारे सन २०१७-१८ चा ‘आदर्श संसदपटू’ पुरस्कार आमदार राहुल कुल यांना जाहीर झाला आहे.
विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण त्यांना दि ४ जुलै २०२१ रोजी मिळाले व त्याच दिवशी त्यांचे वडील, दौंड तालुक्याचे लोकनेते आमदार कै.सुभाष आण्णांचा स्मृतिदिन होता.
मिळालेला पुरस्कार आणि अण्णांचा त्याच दिवशी असलेला स्मृतिदिन हा योगायोग त्यांच्या डोळ्यांच्या कडा आपसूक ओलावून गेला असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवताना मिळालेल्या पुरस्काराबाबत बोलताना… ४ जुलै २००१ रोजी आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, नियतीने डाव साधला आणि कै. सुभाषआण्णा आपल्यातून अकाली सोडून गेले त्यांच्या जाण्याने दौंड तालुका पोरका झाला. आम्हा कुल कुटुंबीयांसमोर अनके यक्ष प्रश्न उभे होते, अनेक संकटे आपल्यासमोर आ वासून उभी होती. ध्यानी मनी नसताना असे अघटित घडले आणि मोठी जवाबदारी अंगावर येऊन पडली, कै. सुभाषआण्णांनी घेतलेलं जनसेवेचे व्रत, संघर्षांचं बाळकडु हा वारसा व प्रेरणा घेऊन समाजकारणाची वाटचाल आपण सुरु ठेवली.
२०१४ मध्ये दौंड तालुक्यातील जनतेने मला विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्याचवेळी या संधीच सोन करण्यासाठी जीवाचं रान करण्याचा संकल्प केला, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने, युवा सहकाऱ्यांच्या साथीने विकासकामांचा डोंगर उभा केला. संसदीय लोकशाहीची सर्व आयुधे वापरून दौंडचा आवाज विधानसभेमध्ये बुलंद केला, ८०० पेक्षा जास्त प्रश्न मांडले, शेकडो चर्चांमध्ये सहभाग घेतला, नेहमी सापत्नभाव मिळालेल्या दौंड तालुक्याचा स्वाभिमान, ओळख जपली.
समाजातील सर्व घटकांना केंद्रबिंदू मानून विकास आणि समाजहित साधत राजकारण या मूलमंत्रासह कै. सुभाषआण्णांच्या विचारांचा वारसा घेऊन, आपल्या सर्वांचे आशीर्वाद, प्रेम व विश्वासाच्या बळावर मी वाटचाल करत आहे, ‘आदर्श संसदपटू’ या पुरस्काराच्या रूपाने कै. सुभाष आण्णांना वाहिलेली हि एक आदरांजली आहे असे मी मानतो व ज्यांच्या मुळे मला हे काम करण्याची संधी मिळाली त्या सर्व मतदार बंधू भगिनींना मी हा पुरस्कार समर्पित करतो.. असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.