पुणे (सहकारनामा) : दौंड तालुक्याचे आमदार ॲड. राहुल कुल यांच्या रेन वॉटर हार्वेस्टिंग व वेस्ट वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम या विषयावर अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास करून व योग्य संशोधनातून तयार करून कार्यान्वित असलेल्या जलभरन व जलसंधारण या मॉडेलला पेटंट कार्यालय भारत सरकारकडून विविध पातळ्यांवर परीक्षण करण्यात आले व सदर जलसंधारण, जलभरन मॉडेल चे पेटंट मंजूर करण्यात येऊन ते प्रकाशित करण्यात आले आहे.
दौंड तालुका हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने पर्जन्याचे प्रमाण कमी व पाणी वापराचे प्रमाण जास्त यामध्ये विसंगती घडून येत होती आमदार ॲड. राहुल कुल यांनी दौंड तालुक्याच्या प्रत्येक भागाचे परीक्षण केले. दौंड तालुक्याच्या दक्षिणेकडील दुष्काळी भागांमध्ये पावसामुळे ओढ़े, नाले, विहिरी तुडुंब भरतात मात्र जमिनीमध्ये मुरणारे पावसाचे पाणी जास्त खोलीपर्यंत पोहोचू शकत नाही.
कारण या भागामध्ये बेसॉल्ट या प्रकारचा अग्निजन्य खडक आढळतो त्यामुळे भूजल रिचार्ज होण्याचे प्रमाण कमी असते व परिणामी उन्हाळ्यामध्ये बऱ्याचशा विहिरी, बोरवेल कोरडे पडतात तसेच पाणी जास्त खोलीवर जात नसल्याने मातीतील क्षार पाण्यात मिसळतात व माती सुद्धा क्षारयुक्त बनते त्याचा एकूणच परिणाम पिकांवर व पिकांच्या उत्पादनावर होतो या दोन्ही गोष्टींचा विचार करून याचे सर्वांगाने संशोधन केले व सदर प्रकल्प राबविला आहे.
सध्या दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामध्ये एक प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असून या प्रकल्पामुळे परिसरातील भूजल पातळी कमालीची उंचावली आहे व त्याचा फायदा सर्वांनाच झालेला आहे सदर प्रकल्पाचे संशोधन करत असताना आमदार ॲड. कुल यांनी सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक दिवेकर व एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालय वरवंड येथील भूगोल विभागाचे प्रा. डॉ. राजेश सुरवसे यांचीही भौगोलिक व भूगर्भशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याकरता मदत झाली आहे.