जलसंपदा मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत आ.राहुल कुल यांच्या मागण्यांना यश

पुणे : आमदार राहुल दादा कुल यांच्या मागणीनुसार राज्याचे जलसंपदा मंत्री मा. नामदार डॉ. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील  यांच्या उपस्थितीत जलविद्युत निर्मितीसाठी मुळशी व कोयना प्रकल्पाद्वारे कृष्णा खोऱ्यातील नैसर्गिकरित्या पूर्वमुखी नद्यांचे कृत्रिमपणे पश्चिमेकडील विपुलतेच्या खोऱ्यात वळविलेले पाणी पूर्वेकडे तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत सुर्वे समितीचे सादरीकरण करण्यासाठी नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी खालील मुद्द्यावर महत्वपूर्ण अशी चर्चा करण्यात आली
१) जलविद्युत निर्मितीसाठी मुळशी व कोयना प्रकल्पाद्वारे कृष्णा खोऱ्यातील नैसर्गिकरित्या पूर्वमुखी नद्यांचे कृत्रिमपणे पश्चिमेकडील विपुलतेच्या खोऱ्यात वळविलेले पाणी पूर्वेकडे तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत सुर्वे समितीचा अहवाल सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सदर अहवालावर मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या समवेत बैठक घेऊन पुन्हा सादरीकरण करून अंतिम निर्णय घेण्यात येईल.

२) दौंड (जि. पुणे) तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅंक वॉटर क्षेत्रात नवीन बॅरेजेस बांधणेसाठी सुधारित धोरण ठरविण्याची मागणी केली – त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून, यामुळे दौंड, शिरूर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा परिसरातील शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार असल्याने तातडीने कार्यवाही करावी असे आदेश मा. मंत्री महोदयांनी दिले

३) मुळा मुठा व भीमा नदीवर अस्तित्वात असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजेस मध्ये रूपांतर करण्यात यावे, हे सर्व बंधारे अतिशय जीर्ण झालेले असून त्याचे बॅरेजेस मध्ये रूपांतर करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांना मान्यता देण्यात यावी असे आदेश मा. मंत्री महोदयांनी दिले

४) सन १९९१ नंतर पाझरचर करण्यासाठी मापदंड निश्चित करण्यात आले नव्हते, मापदंड अभावी नवीन चर योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत नव्हती. त्यासाठी समितीची नेमणूक करण्यात आली होती, या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ओपन पाझरचर योजनेसाठी आवश्यक मापदंड ठरविण्यात आले, परंतु अनेक शेतकरी बंदिस्त पाझरचर करण्यासाठी इच्छुक असून त्यासाठी धोरण नसल्याने बंदिस्त पाझरचर करण्यास त्यांना अनेक अडचणी येत आहे. त्यामुळे “बंदिस्त पाझरचर” करण्यासाठी देखील मापदंड ठरविणे आवश्यक आहे याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी असे आदेश मा. मंत्री महोदयांनी दिले.

यावेळी समितीचे प्रमुख अविनाश सुर्वे, पानसे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कोपोले, जलसंपदा प्रकल्प समन्वयक संजय बेलसरे, पुणे पाटबंधारे प्रकल्पाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांच्यासह जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.