दौंड : भारतीय जनता पार्टी पक्षाच्यावतीने दौंड विधानसभेसाठी विद्यमान आमदार राहुल कुल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आ.कुल यांना उमेदवारी जाहीर होताच दौंडमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवुन एकच जल्लोष केला आहे.
आमदार राहुल कुल यांच्या उमेदवारीचा जल्लोष करण्याकरिता दौंड चे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, भाजपा तालुका अध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, ज्येष्ठ नगरसेवक नंदू भाऊ पवार, अण्णासाहेब जगताप, आरपीआयचे रोहित कांबळे प्रकाश भालेराव, पी आर पी चे अमित सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे अश्विन वाघमारे तसेच कुल कटारिया गटाचे आजी-माजी नगरसेवक व मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आमदार कुल यांना शुभेच्छा दिल्या.
याबाबत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी बोलताना, भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने दौंड विधानसभा मतदार संघातून माझ्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली त्याबद्दल मी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच केंद्रीय निवडणूक समिती, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार मानत असल्याचे सांगितले.
विद्यमान आमदार राहुल कुल यांना पुन्हा भाजप ने उमेदवारी दिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांना नेमकी कुणाची उमेदवारी मिळणार याकडेही तालुक्याचे लक्ष लागले आहे. मा.आ.रमेश थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र अद्यापतरी त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे रमेश थोरात अपक्ष उभे राहतात कि शरदचंद्र पवार गटाकडून त्यांना उमेदवारी दिली जाते हे काही दिवसांत समजणार आहे. आमदार राहुल कुल यांचा आरोग्य सुविधा आणि विकासकामांमुळे सहज विजय होईल असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.