श्री. क्षेत्र भुलेश्वरचा विकास करण्यासाठी आ. राहुल कुल यांची 2 कोटींची मागणी, प्रधान सचिवांकडून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

पुणे : संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या आणि दौंड व पुरंदर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पांडवकालीन श्री. क्षेत्र भुलेश्वर मंदिर परिसरातील वन उद्यानाचा विकास व्हावा म्हणून आमदार राहुल कुल यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले होते. आमदार राहुल कुल यांनी या विकासकामाला 2 कोटी रुपये मिळावेत अशी मागणी केली होती.

आता त्या मागणीबाबत मोठी घडामोड सामोर येत असून श्री. क्षेत्र भुलेश्वरचा प्रस्ताव प्रधान सचिवांकडून सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  वन विभागाचे प्रधान सचिव श्री. वेणुगोपाल रेड्डी यांना बैठक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार  सोमवार दि. 2 सप्टेंबर रोजी ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती.

श्री. क्षेत्र भुलेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर वन जमिन असून या ठिकाणी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणवर भाविक भक्त येत असतात, श्रावण महिन्यात मोठी यात्रा या ठिकाणी भरत असते. भाविक भक्तांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी वन उद्यानाचा विकास करण्यासाठी २ कोटींचा निधी मिळावा अशी मागणी या बैठकीत आमदार राहुल कुल यांनी केली.

यावेळी प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी 2 कोटींच्या कामाचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीला मुख्य वन संरक्षक पुणे एन.आर. प्रवीण, उपवन संरक्षक पुणे महादेव मोहिते, उपसचिव विवेक होशिंग आदी उपस्थित होते.