आमदार ‘राहुल कुल’ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला रेकॉर्ड ब्रेक गर्दी, पुणे सोलापूर हायवेही झाला जाम.. ना टिका, ना टिप्पणी फक्त काम एके काम

अब्बास शेख

दौंड : दौंडचे आमदार राहुल कुल यांचा विधनसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आलेल्या मतदारांमुळे आज पर्यंतच्या गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक झाले. विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार राहुल कुल यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी वाहणांच्या गर्दीमुळे पुणे सोलापूर हायवे काही काळासाठी जाम झाला होता तर दौंड शहराच्या मुख्य चौकातील सर्वच गल्ल्या गर्दीने भरून गेल्या होत्या.

हे सर्व चित्र पाहून आमदार राहुल कुल यांनी आलेल्या सर्व मतदार, कार्यकर्त्यांचे आभार मानले अण माझ्या मनात एक सल होती आणि ती सल मी अनेकवेळा बोलून दाखवली होती मात्र आजची गर्दी पाहून माझ्या मनातील ती सल निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. त्या सल बद्दल बोलताना आ.कुल म्हणाले की, पहिल्या निवडणुकीत मला धोका झाला होता त्यामुळे अपयश आले होते. मात्र पुढील दोन्ही पंचवार्षिक निवडणुका जिंकण्यात आपल्याला यश आले. मात्र समोरील विरोधक कोणतेही काम करत नसताना त्यांना आपल्या बरोबरीने मते कशी मिळतात ही माझ्या मनात सल होती. मात्र आजची गर्दी अण लोकांचे प्रेम पाहून माझ्या मनातील ती सल दूर झाली आहे आणि आपण मला मोठ्या मताधिक्क्याने विजयी कराल यात मला आता शंका राहिली नसल्याचे त्यांनी सांगितले.

माझ्या मतदार संघातील लोकांची मने मला कळतात, त्यांच्या देहबोलीवरून मला त्यांच्या अडचणीही लक्षात येतात त्यामुळे मी माझ्या मतदार संघातील लोकांच्या कायम पाठीशी असेल असा विश्वास त्यांनी उभयतांना देत माझ्या कुटुंबाने कायमच सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि जे पिडीत आहे त्यांना कायम मदत करत आलो आहोत. शहरात, तालुक्यात राहिलेली अण सध्या चालू असलेली सर्व कामे पुढील सहा महिन्यात पूर्ण होतील याची शास्वती देतो असे कुल यांनी सांगितले.

विकासाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी, तालुक्यात जिल्हा न्यायालय आणले, प्रांत कार्यालय आणले, तालुक्यातील रस्ते, विजेची कामे मार्गी लावली. प्रधानमंत्री आवास योजना, जलयुक्त शिवार, पाणी योजना कार्यान्वित केली. पुढील पाच वर्षात या तालुक्यातील पाण्याची परिस्थिती बदलून अण मुळशी धरणाच्या माध्यमातून पुढील १०० वर्षे पाण्याची कोणतीही अडचण शेतकऱ्यांना जाणवणार नाही असे नियोजन करत असल्याचे  त्यांनी उपस्थित जन समुदायाला सांगितले.

आमदार राहुल कुल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी, थोरल्या पवारांना दादा नको असले तरी दौंडच्या जनतेला दादा हवे आहेत त्यामुळे दादा तिसऱ्यांदा आमदार होणारच. दादा फडणवीसांचे विश्वासू आमदार आहेत. देखणा, राजबिंडा, स्मार्ट आमदार मंत्री झाला तर या भागाचा कायापालट होईल असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी राज्यात महाविकास आघाडीची हवा वगैरे काहीनाही, लाडकी बहीण योजनेने यांची हवा काढून घेतली आहे. जो राज्यात, देशात राहतो त्या सर्वांची सुरक्षा आमच्यासाठी महत्वाची आहे.

दादांना निधी आणायचे माहित आहे, विकासकामे करायची माहिती आहे. आम्ही सुद्धा त्यांचे मार्गदर्शन घेतो. तुम्ही दादांना आमदार म्हणून मुंबईला पाठवा, फडणवीस त्यांना नामदार (मंत्री) म्हणून दौंडला पाठवतील. जलयुक्त शिवार योजना फडणवीस यांनी राज्यात, जिल्ह्यात तालुक्यात आणली त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाच्या पाण्याची चिंता मिटली. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले. मराठा समाजाचे आरक्षण महाविकास आघाडीमुळे टिकले नव्हते. मात्र महायुतीचे सरकार आल्यावर मराठा समाजाला १० टक्के वेगळे आरक्षण याच सरकारने दिले. या सरकारने सर्वच जाती धर्मासाठी विविध योजना आणल्या अण त्यातून सर्व घटकांचा विकास केला असल्याचे म्हटले.

यावेळी आमदार योगेश टिळेकर यांनी बोलताना, योगेश टिळेकर – राहुदादा हे विधानसभेमध्ये जिद्दीने पाठपुरावा करणारे आमदार आहेत. फडणवीस साहेबसुद्धा त्यांच्या कामावर कायम खुश असतात. दादा तेवीस तारखेला आमदारच नव्हे तर मंत्री सुद्धा होणार. आरोग्य दूत म्हणून त्यांना मिळालेली पदवी त्यांनी सार्थ करून दाखवली असून माळी समाजाला न्याय महायुती सरकारने दिला आहे त्यामुळे आमचा माळी समाज हा महायुतीसोबत असल्याचे सांगितले.

सभेच्या सुरुवातीला वासुदेव काळे, प्रेमसुख कटारिया, नंदू पवार यांची भाषणे झाली यावेळी वासुदेव काळे यांनी बोलताना, विकासासाठी भाजप च्या उमेदवारांना, कमळाला निवडून द्यायचे आहे. शासनाच्या विविध योजना कायम सुरु राहण्यासाठी महायुतीचे सरकार गरजेचे आहे असे म्हटले. प्रेमसुख कटारिया यांनी बोलताना, आरोग्यदूत होणं इतकं सोपं नाही. ज्या रुग्णाजवळ नातेवाईक जायला घाबरायचे त्याजवळ दादा जाऊन त्यांची विचारपूस करायचे, दादांनी शहरात विकासकामे केली. हा प्रचंड जनसमुदाय दादांच्या कामाची पावती आहे. कुणीतरी येतं आणि केवळ खुर्चीवर बसायचं म्हणून उमेदवारी अर्ज भरतं पण दादा हे कामाचे नेते आहेत म्हणून ते लोकांमध्ये प्रिय  असल्याचे सांगितले. जेष्ठ नेते नंदू पवार यांनी बोलताना, आजच्या लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून हे सर्वांना समजले आहे की रेकॉर्ड ब्रेक लीड ने दादा निवडून येणार अण दादांना यावेळी मंत्रिपद मिळणारच असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.